
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ramayana Box Office Collection: बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित आणि भव्य चित्रपटांपैकी एक असलेला रणबीर कपूरचा ‘रामायण’ अखेर ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले असून ‘रामायण’ने दमदार ओपनिंग केली आहे.
रणबीर कपूर आणि यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळच्या शोपासूनच अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही चित्रपटातील व्हीएफएक्स, रणबीर कपूर आणि यश यांचा अभिनय तसेच संगीताचे कौतुक केले जात आहे. विशेषतः रावण आणि जटायू यांच्यातील दृश्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियांचा चित्रपटाच्या कमाईला फायदा झाल्याचे दिसत आहे.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘रामायण’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २५,२०० शोजमधून भारतात ६४.८५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. तर चित्रपटाचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ७७.५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपटाने विविध भाषांमध्ये केलेली कमाई पुढीलप्रमाणे आहे.
हिंदी: २०,६७८ शोजमधून ४७.५० कोटी रुपये
कन्नड: १,१९७ शोजमधून ७.२५ कोटी रुपये
तेलुगू: १,७७६ शोजमधून ६ कोटी रुपये
तमिळ: ९९२ शोजमधून २.६० कोटी रुपये
मल्याळम: ५५७ शोजमधून १.५० कोटी रुपये
‘पठाण’, ‘ॲनिमल’ आणि ‘धुरंधर’चे रेकॉर्ड मोडले
‘रामायण’ने पहिल्याच दिवशी अनेक लोकप्रिय चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनला मागे टाकले आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच या चित्रपटाने रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’च्या पहिल्या दिवसाच्या २८ कोटी रुपयांच्या कमाईला मागे टाकले. त्यानंतर शाहरुख खानचा ‘पठाण’ (५७ कोटी रुपये), रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ (६३ कोटी रुपये) आणि अजय देवगणचा ‘दृश्यम २’ (६२ कोटी रुपये) या चित्रपटांचे ओपनिंग डे कलेक्शनही मागे टाकले.
मात्र, ‘रामायण’ला शाहरुख खानच्या ‘जवान’च्या ७५ कोटी रुपयांच्या ओपनिंग कलेक्शनला मागे टाकता आले नाही. तसेच रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ने यंदा पहिल्याच दिवशी केलेल्या १०२ कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमही कायम आहे.
‘रामायण’ हा मोठ्या बजेटचा चित्रपट असल्याने पहिल्याच दिवशी १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार चित्रपटाला हा आकडा गाठता आलेला नाही. तरीही ६४.८५ कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनसह चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. आता आगामी दिवसांत चित्रपटाच्या कमाईत किती वाढ होते आणि तो आणखी कोणते विक्रम मोडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.