
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ramayana New Posters: रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटातील प्रमुख पात्रांचे नवे पोस्टर्स रिलीज केले आहेत. या पोस्टर्समध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि यश यांचे खास लूक पाहायला मिळत आहेत. पोस्टर्स सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
निर्मात्यांनी शेअर केलेल्या पहिल्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहेत. तिन्ही कलाकारांच्या मागे जंगलाचा परिसर पाहायला मिळतो. तिघांचाही लूक वनवासातील असल्याचं पोस्टरवरून दिसत आहे.
या पोस्टरमध्ये रणबीर कपूरच्या एका बाजूला साई पल्लवी, तर दुसऱ्या बाजूला रवी दुबे उभे आहेत. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी ‘धर्मात नेहमी एकत्र’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
राम, सीता आणि लक्ष्मणाच्या पोस्टरनंतर निर्मात्यांनी यशच्या रावणाच्या भूमिकेतील पोस्टरही रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये यश रावणाच्या रूपात दिसत असून, त्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याची लंका पाहायला मिळत आहे.
यशचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. रावणाच्या भूमिकेतील यशचा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी ‘तिन्ही लोकांचा राजा, रावण’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
‘रामायण’मध्ये दिसणार कलाकारांची मोठी फळी
‘रामायण’मध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि रवी दुबे यांच्यासोबत विवेक ओबेरॉय, रकुल प्रीत सिंग, काजल अग्रवाल, लारा दत्ता, कुणाल कपूर, इंदिरा कृष्णन आणि शीबा चड्ढा यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘रामायण’चा पहिला भाग यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग पुढील दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पोस्टर्समुळे आता चित्रपटातील पात्रांच्या लूकबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.