'धाकट्या सूनबाई' मालिकेतून मंदार जाधवचे झी मराठीवर पदार्पण
Exclusive: आतापर्यंत अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला अभिनेता मंदार जाधव आता झी मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘धाकट्या सुनबाई’ या मालिकेत तो वेदांत पटवर्धन ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे. मंदार जाधवने या निमित्ताने ‘नवराष्ट्र’सह खास गप्पा मारल्या.
ही मालिका कशी मिळाली आणि भूमिकेसाठी कशी निवड झाली? यावर मंदार अगदी मनमोकळेपणाने म्हणाला की, ‘ कोठारे व्हिजनची ही मालिका आहे आणि त्यांच्याबरोबर अगदी कुटुंबासारखे संबंध आहेत. ही भूमिका माझ्याकडे आली तेव्हा नकार द्यायचा काही प्रश्नच नव्हता. कारण त्यांच्यासह काम करताना मला फारच मजा येते आणि त्यांची काम करण्याची पद्धत खूपच चांगली आहे. त्यामुळे जराही विचार न करता लगेच होकार दिला.’
झी मराठीसह पहिल्यांदाच काम करत आहेस तर अनुभव कसा आहे? यावर मंदार म्हणाला की, ‘झी कुटुंबाबरोबरच माझी सुरूवात झाली खरं तर आणि त्यामुळे मला कुटुंबात परत आल्यासारखे वाटत आहे. अनेक जणांना माहीत नसेल पण झी टीव्ही हिंदीपासून माझ्या करिअरची सुरूवात झाली आणि त्यानंतर मी मराठी मालिकांमध्ये आलो. इतके वर्ष तो योग जुळून येत नव्हता. मात्र यावेळी सगळे योग जुळून आल्यासारखं वाटतंय’
Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर
‘धाकट्या सूनबाई’मधील वेदांत पटवर्धन ही व्यक्तिरेखा कशी आहे आणि मंदारशी काही साम्य आहे का? यावर मंदार पटकन म्हणाला की, ‘वेदांत हा आजच्या पिढीचा सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण आहे. आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा, सर्वांचा आदर करणारा पण तितकाच ठाम मताचा आहे. एक गोष्ट नक्की सांगेन की प्रत्येक आईला वाटेल की असा मुलगा असावा, बहिणीला असा भाऊ असवा आणि प्रत्येक गर्लफ्रेंडला हवासा वाटणारा बॉयफ्रेंड अशी ही व्यक्तिरेखा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कोणावरही अन्याय वा अत्याचार सहन न करणारा आहे, अगदी कुटुंबाच्या विरोधात जावं लागलं तरीही तो त्यासाठी जायला तयार होईल.’ पुढे मंदार म्हणाला की, ‘माझ्याशी या व्यक्तिरेखेशी साम्य म्हणजे मी सुद्धा माझ्या आयुष्यात तितकाच ठाम मताचा आहे आणि स्वतःवर प्रेम करणारा आहे. इतरांसह स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि मी तसाच आहे’
ही भूमिका तुला का स्वीकारावी वाटली? त्यासाठी काय तयारी केलीस? असं विचारल्यावर मंदार म्हणाला की, ‘अभिनेता म्हणून काम करताना आव्हानं स्वीकारायला मला आवडतं. यापूर्वी मी साकारलेल्या भूमिकेपेक्षा वेदांत ही व्यक्तिरेखा वेगळी आहे. त्याचा लुक, वागणं, बोलणं सर्वच वेगळं आहे आणि या व्यक्तिरेखेसाठी मी २ महिने प्रचंड मेहनत केली आहे. वेदांत हा आताच्या Gen Z प्रमाणे आहे. त्यामुळे त्याचा लुक अगदी फ्रेश आहे. हिरोसारखा दिसावं यासाठी डाएटवर पण खूप काम करावं लागलं. प्रेक्षकांना वेदांत आपलासा वाटवा यासाठी खूप तयारी केली आहे. याशिवाय व्यक्तिरेखेला प्रत्येक कलाकार व्यक्तिगत टच देत असतो आणि वेदांतच्या या भूमिकेसाठीही मी तशीच मेहनत करतोय’
मेघनदेखील झी वर भूमिका करतोय, जेव्हा घरी कळलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? यावर अगदी उत्साहाने मंदारने सांगितलं की, ‘घरी सांगितल्यावर सर्वांचीच प्रतिक्रिया खूप मस्त होती. कारण मेघन जयंतच्या भूमिकेत कमाल करतोय आणि आता दोघेही भाऊ एकाच वाहिनीवर काम करणार त्यामुळे प्रेक्षकांना आणि घरच्यांनाही काही कार्यक्रमांना आम्हाला एकत्र पाहता येईल किंवा मालिकेच्या १ तासाच्या भागातही कदाचित आम्ही कधीतरी एकत्र दिसू अशी आम्हाला दोघांना पण अपेक्षा आहे आणि त्या निमित्ताने दोघांना एकत्र काम करता येईल हा तर वेगळाच आनंद आहे’
प्रेक्षकांकडून तुझी काय अपेक्षा आहे? यावर मंदार अगदी मनापासून म्हणाला की, ‘प्रेक्षक हे आपले मायबाप आहेत. त्यांचं मनोरंजन करणं हेच आमचं काम आहे. पण एखादी गोष्ट आवडली नाही तर त्यांनी ती कोणत्याही माध्यमातून माझ्यापर्यंत पोहचवावी मी त्यात बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि कायम त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेन हे नक्की. माझी त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. फक्त त्यांनी मला भरभरून प्रेम द्यावे इतकंच मनापासून वाटतं’ ‘धाकट्या सूनबाई’ ही मालिका झी मराठीवर २८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि मंदारने प्रेक्षकांना मनापासून आपली मालिका पाहण्याचे आवाहनही या मुलाखतीद्वारे केलंय.






