
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. नुकताच मुंबईत ‘रामायण’साठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकारांसोबत अमेरिकन यूट्यूबर मिस्टर बीस्ट म्हणजेच जिमी डोनाल्डसन यानेही हजेरी लावली.
या कार्यक्रमातील रणबीर कपूर आणि मिस्टर बीस्टचा एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर मिस्टर बीस्टला ‘जय श्री राम’ म्हणायला शिकवताना दिसत आहे. मिस्टर बीस्टनेही रणबीरच्या सांगण्यावरून ‘जय श्री राम’ म्हटलं. त्याचा हा अंदाज भारतीय चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
कार्यक्रमादरम्यान मिस्टर बीस्टने ‘जय श्री राम’ म्हटल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. रणबीर कपूरने यावेळी मिस्टर बीस्टला प्रभू रामाबद्दल आणि ‘जय श्री राम’ म्हणण्यामागील भावनेबद्दल माहिती दिली.
प्रभू रामांविषयी बोलताना रणबीरने सांगितले की, त्यांचा जन्म राजकुमार म्हणून झाला होता. त्यांच्याकडे सर्व सुख-सुविधा होत्या; मात्र वडिलांना दिलेल्या वचनासाठी आणि आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी या सर्वांचा त्याग केला. रणबीरने सांगितलेल्या या गोष्टी मिस्टर बीस्टनेही उत्सुकतेने ऐकल्या.
रणबीर आणि मिस्टर बीस्ट यांच्यातील हा खास संवाद आणि ‘जय श्री राम’ म्हणतानाचा क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. चाहत्यांकडून या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
#RanbirKapoor made World’s No 1 Youtuber Mr. Beast Chant Jai Shree Ram during Ramayana Event in Mumbai. https://t.co/rJi3kXEaMJ — KBP Reviews🏹 (@KshitizCritic) September 26, 2026
दरम्यान, रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये रणबीर कपूर, रवी दुबे आणि सई पल्लवी एकत्र दिसत आहेत. पोस्टर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याचीही चर्चा रंगली आहे.
चित्रपटात रणबीर कपूर प्रभू राम, रवी दुबे लक्ष्मण, तर सई पल्लवी सीता यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता यश रावणाची भूमिका साकारत आहे.
‘रामायण’ हा चित्रपट या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकार, पोस्टर आणि प्रमोशनल कार्यक्रमांमुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे.