
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Reporting Live Trailer: अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच एका दमदार थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या आगामी ‘रिपोर्टिंग लाइव्ह’ या चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित करण्यात आला. अवैध वाळू उत्खनन आणि त्यामागे सुरू असलेल्या वाळू माफियांच्या धोकादायक जाळ्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने ट्रेलरमधूनच उत्सुकता वाढवली आहे.
सुमारे २ मिनिटे २ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये अवैध वाळू उत्खननाचा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, याची झलक पाहायला मिळते. या काळ्या धंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी पत्रकारितेचा मार्ग स्वीकारणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी रिपोर्टरची कथा यात दाखवण्यात आली आहे.
परिणीती चोप्रा या चित्रपटात फील्ड रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. एका जीवघेण्या अपघातानंतर ती आणि कॅमेरामनच्या भूमिकेतील देवेन भोजानी काही गंभीर प्रश्न उपस्थित करू लागतात. मात्र, या प्रश्नांची उत्तरं देण्यास प्रभावशाली व्यक्ती तयार नसतात.
प्रत्येक उत्तरासोबत वाढत जाणार धोका
रिपोर्टर आणि कॅमेरामन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ते या प्रकरणात जितके खोलवर जातात, तितकाच त्यांच्या जीवाला धोका वाढत जातो. प्रत्येक उत्तरानंतर नवा प्रश्न आणि प्रत्येक सुगाव्यानंतर नवं संकट त्यांच्यासमोर उभं राहतं.
सत्य शोधण्याच्या या प्रवासात पत्रकारितेची ताकद, गुन्हेगारी आणि सत्तेचा प्रभाव यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘रिपोर्टिंग लाइव्ह’चा ट्रेलर थरार आणि रहस्याने भरलेला दिसत आहे.
‘रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये परिणीती चोप्रा आणि देवेन भोजानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अमोल पालेकर, आदिल हुसेन आणि शेखर सुमन हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
ध्रुव त्रिपाठींचं दिग्दर्शन
या चित्रपटाचे दिग्दर्शन ध्रुव त्रिपाठी यांनी केले आहे. विशेष म्हणजे, दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. पत्रकारिता, गुन्हेगारी आणि अवैध वाळू उत्खननाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना किती भावते, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल.