(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
स्टार प्लसने त्यांच्या लोकप्रिय शो “क्योंकी सास भी कभी बहू थी” सीझन 2 बंद होणार असल्याच्या आणि त्याऐवजी दुसरा शो येणार असल्याच्या सर्व अफवांना अधिकृतपणे फुलस्टॉप दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात आणि विविध माध्यमांमध्ये अशी चर्चा रंगली होती की, हा शो बंद करून त्याऐवजी “क्योंकि रिश्तों के भी रूप बदलते” हा नवीन शो आणला जाणार आहे. मात्र, स्टार प्लसने स्पष्ट केले आहे की, “क्योंकी सास भी कभी बहू थी” चाहत्यांसाठी कायम सुरू राहणार आहे आणि सीझन 2 बंद करण्याचा विचार नाही.
यावर स्पष्टीकरण देताना स्टार प्लसने अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की या सर्व अफवा पूर्णपणे निराधार आहेत आणि शो बंद होणार किंवा त्याची जागा दुसरा शो घेणार अशी कोणतीही सत्यता नाही.
अधिकृत घोषणेत त्यांनी लिहिले, “आमच्या लक्षात आले आहे की काही माध्यमांमध्ये अशा बातम्या फिरत आहेत की ” क्योंकी सास भी कभी बहू थी” सीझन 2 बंद होत आहे आणि त्याजागी “क्योंकि रिश्तों के भी रूप बदलते” हा शो येणार आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की या बातम्या निराधार आहेत. आम्ही “क्योंकी सास भी कभी बहू थी” सीझन 2 बंद करत नाही आहोत आणि सध्या तरी या शोचा शेवट ठरलेला नाही”
स्टार प्लसकडून दिलेले अधिकृत निवेदन चाहत्यांसाठी मोठा दिलासा देणारे ठरले आहे. “क्योंकी सास भी कभी बहू थी” हा दूरचित्रवाणीवरील सर्वात आयकॉनिक शो मानला जातो. त्याची प्रभावी कथा आणि लक्षात राहणारी पात्रे यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शो बंद होणार आणि त्याऐवजी नवीन शो येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, स्टार प्लसच्या अधिकृत निवेदनानंतर प्रेक्षक निश्चिंत झाले आहेत की, हा शो पुढेही त्यांचे मनोरंजन करत राहील. या स्पष्टिकरणामुळे सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे आणि चाहत्यांचा उत्साह कायम राहणार आहे.






