(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bhagyashree Dalvi Engagement: मराठी कलाविश्वात यंदा अनेक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेत्री ओम भूतकरने गुपचूप लग्नगाठ बांधली. त्यानंतर अभिनेता गंधार खारपुडीकरच्या लग्नाची चर्चा रंगली. आता ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवी हिच्या आयुष्यातही नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. भाग्यश्रीने बॉयफ्रेंड सुमेध म्हात्रेसोबत साखरपुडा केला असून त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
‘दार उघड बये’, ‘सांग तू आहेस का?’ आणि ‘खरंच तिचं काय चुकलं’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या भाग्यश्रीने काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. आता भाग्यश्री आणि सुमेध म्हात्रे यांचा साखरपुडा पार पडला आहे.
भाग्यश्री आणि सुमेध यांची जवळपास १४ वर्षांपासून मैत्री असल्याची माहिती आहे. सुमेध म्हात्रे हा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असून स्टार प्रवाह वाहिनीच्या निर्मिती विभागात एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रोड्युसर म्हणून काम करतो. दीर्घकाळाच्या मैत्रीनंतर त्यांच्या नात्याचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
भाग्यश्री आणि सुमेधच्या साखरपुडा सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आरती मोरे, श्रेयस राजे, फुलवा खामकर, समृद्धी केळकर आणि प्राप्ती रेडकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली.
साखरपुड्याच्या फोटोंमध्ये भाग्यश्रीचे दोन सुंदर लूक पाहायला मिळत आहेत. एका लूकमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे, तर दुसऱ्या लूकमध्ये ती बॉटल ग्रीन रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. सुमेधने क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती.
या सोहळ्यातील एक खास क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुमेध गुडघ्यावर बसून भाग्यश्रीला अंगठी घालताना दिसत आहे. या रोमँटिक क्षणाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
‘दादरचा धनुष आणि भांडूपची सोनम कपूर’!
भाग्यश्री आणि सुमेध यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मित्रपरिवाराने शेअर केलेले साखरपुड्याचे फोटो रिपोस्ट केले आहेत. यातील एका फोटोवर मित्राने भन्नाट कॅप्शन लिहिलं आहे—‘दादरचा धनुष आणि भांडूपची सोनम कपूर’. या मजेशीर कॅप्शनचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
भाग्यश्रीचं यापूर्वी लग्न झालं होतं. काही वर्षांनंतर तिने सुमेधसोबतच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली. तिच्या पहिल्या लग्नाबाबत आणि घटस्फोटाबाबत तिने सार्वजनिकरित्या फारशी माहिती दिलेली नाही. आता सुमेधसोबत साखरपुडा झाल्यानंतर भाग्यश्रीच्या आयुष्यातील नव्या पर्वासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भाग्यश्री दळवीच्या मालिकांची यादी
भाग्यश्रीने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सांग तू आहेस का’, ‘भाग्य दिले तू मला’, ‘दार उघड बये’ आणि ‘खरंच तिचं काय चुकलं’ या मालिकांमधून तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली. सध्या ती ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत तारा ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.
याशिवाय भाग्यश्री ‘क्यू रिश्तों मे कट्टी बट्टी’ या हिंदी मालिकेतही झळकली आहे. तर तिचा होणारा पती सुमेध म्हात्रे हा स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या निर्मिती विभागात एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे.
Mrunal Thakur : मृणाल ठाकूर १० वर्षांनी लहान क्रिकेटरला डेट करतेय? अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर






