
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sayani Gupta : अभिनेत्री सायानी गुप्ता हिने आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणाने जगभरात छाप पाडली आहे. लेखिका-दिग्दर्शिका म्हणून तिचा पहिला चित्रपट असलेल्या ‘आसमानी’ची गेल्या दोन महिन्यांत अमेरिका, कॅनडा, जपान आणि भारतातील तब्बल १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपटाचे कौतुक होत असून, ‘आसमानी’ने अनेक पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत.
सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली दखल निर्माण केली आहे. Washington DC South Asian Film Festival, Tokyo International Short Film Festival, India International Film Festival of Boston, Chicago South Asian Film Festival आणि Atlanta International Film Festival यांसारख्या महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये चित्रपटाची निवड झाली आहे.
भारतात परतल्यानंतर ‘आसमानी’ने Bangalore International Short Film Festivalमध्ये India Competitionमध्येही सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे सायानीच्या या पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नाची चर्चा देश-विदेशात होत आहे.
फिल्म फेस्टिव्हलमधील निवडीसोबतच ‘आसमानी’ने अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. 59th WorldFest Houston येथे चित्रपटाला REMI Special Jury Best Children/Family Film पुरस्कार मिळाला. तसेच Indie Meme Film Festival Austin, US येथे Best Short Film – Audience Choice Award मिळाला आहे.
याशिवाय Cannes Film Festival of the World येथे Best Children/Family Film पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कार ‘आसमानी’ने आपल्या नावावर केले आहेत.
‘आसमानी’ची कथा एका उत्साही आजी-नातीच्या जोडीभोवती फिरते. त्यांच्यासोबत असलेली त्यांची पॉवर ब्लू कारही या कथेत महत्त्वाची भूमिका बजावते. प्रेम, विरह आणि मैत्रीच्या भावनांना स्पर्श करणारी ही कथा विविध संस्कृती आणि देशांमधील प्रेक्षकांच्या मनाला भावत आहे.
वेगवेगळ्या देशांमधील स्क्रीनिंग रूममध्ये ‘आसमानी’ला मिळणारा प्रतिसाद हा चित्रपटाच्या वैश्विक आशयाची झलक देतो.
अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केल्यानंतर सायानी गुप्ताने ‘आसमानी’च्या माध्यमातून कॅमेऱ्यामागची जबाबदारी स्वीकारली आहे. लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून तिचा हा पहिलाच प्रयत्न असून, पदार्पणाच्या शॉर्ट फिल्मला मिळणारा आंतरराष्ट्रीय प्रतिसाद तिच्यासाठी निश्चितच महत्त्वाचा ठरत आहे.
आता ‘आसमानी’ विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रवास करत असून, सायानी गुप्ताच्या या दिग्दर्शकीय पदार्पणाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्सुकतेने पाहिलं जात आहे.