(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Scam 1992: ओटीटी विश्वात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र, काही मालिका अशा असतात, ज्या प्रदर्शनानंतर अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. बिर्ला स्टुडिओज आणि अप्लॉज एंटरटेनमेंट यांच्या लोकप्रिय मालिकांनी असाच ठसा उमटवला आहे. IMDb ने भारतीय स्ट्रीमिंग विश्वातील गेल्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ने अव्वल स्थान पटकावले आहे. याशिवाय ‘क्रिमिनल जस्टिस’ आणि ‘ब्लॅक वॉरंट’ या मालिकांचाही या यादीत समावेश आहे.
हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम १९९२’ ही मालिका ऑक्टोबर २०२० मध्ये प्रदर्शित झाली होती. हर्षद मेहता यांच्या आयुष्यावर आणि भारताच्या आर्थिक इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडींवर आधारित या मालिकेने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. IMDb च्या भारतीय स्ट्रीमिंगवरील गेल्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांच्या यादीत या मालिकेने अव्वल स्थान मिळवलं आहे.
विशेष म्हणजे, २०२० मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर २०२४ पर्यंत सलग पाच वर्षे या मालिकेने लोकप्रियतेच्या यादीत आपलं स्थान कायम ठेवलं. मालिकेतील कथा, कलाकारांचा अभिनय आणि सादरीकरण यामुळे आजही प्रेक्षकांमध्ये तिची चर्चा कायम आहे.
‘क्रिमिनल जस्टिस’चीही लोकप्रियतेत बाजी
‘स्कॅम १९९२’सोबतच ‘क्रिमिनल जस्टिस’ या मालिकेनेही IMDb च्या लोकप्रिय मालिकांच्या यादीत आपली छाप उमटवली आहे. २०१९, २०२१, २०२२ आणि २०२५ या वर्षांच्या यादीत या मालिकेचा समावेश झाला. प्रत्येक नव्या पर्वासोबत प्रेक्षकांची उत्सुकता कायम राखण्यात या मालिकेला यश मिळालं आहे.
दरम्यान, चर्चेत राहिलेल्या ‘ब्लॅक वॉरंट’ या मालिकेलाही २०२५ च्या यादीत स्थान मिळालं. या तीन मालिकांच्या यशामुळे बिर्ला स्टुडिओज आणि अप्लॉज एंटरटेनमेंट यांच्या आशयनिर्मितीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
‘स्कॅम १९९२’च्या यशाबद्दल निर्मात्यांना अभिमान
अप्लॉज एंटरटेनमेंटचे मुख्य आशय अधिकारी दीपक सहगल यांनी ‘स्कॅम १९९२’च्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. हंसल मेहता यांच्या सर्जनशील दृष्टिकोनामुळे या मालिकेला वेगळी ओळख मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. ‘क्रिमिनल जस्टिस’ आणि ‘ब्लॅक वॉरंट’ या मालिकांनाही प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या मते, ‘स्कॅम १९९२’चं यश केवळ प्रदर्शनाच्या वेळी मिळालेल्या प्रतिसादावर अवलंबून नाही. अनेक वर्षांनंतरही ही मालिका सत्ता, पैसा, महत्त्वाकांक्षा आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करते, हीच तिची खरी ताकद आहे. सलग पाच वर्षे लोकप्रियतेच्या यादीत स्थान टिकवणं हे प्रेक्षकांचं मालिकेवरील प्रेम दर्शवतं, असंही त्यांनी सांगितलं.
प्रतीक गांधींसाठीही खास ठरला हर्षद मेहताचा प्रवास
‘स्कॅम १९९२’मध्ये हर्षद मेहताची भूमिका साकारणारे अभिनेता प्रतीक गांधी यांच्यासाठीही ही मालिका महत्त्वाची ठरली. या भूमिकेमुळे त्यांच्यासमोर अभिनयाच्या नव्या संधी खुल्या झाल्या. इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम आपल्यासाठी खास असल्याचं प्रतीक गांधी यांनी म्हटलं. त्यांना ही भूमिका देणाऱ्या हंसल मेहता यांचेही त्यांनी आभार मानले.
‘स्कॅम’ मालिकामालिकेचा प्रवास अद्याप सुरूच आहे. ‘स्कॅम २०१०’ या तिसऱ्या पर्वाच्या तयारीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या नव्या पर्वातून भारताच्या आर्थिक इतिहासातील आणखी एका महत्त्वपूर्ण अध्यायाची कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
IMDb च्या लोकप्रिय मालिकांच्या यादीतील या यशामुळे ‘स्कॅम १९९२’, ‘क्रिमिनल जस्टिस’ आणि ‘ब्लॅक वॉरंट’ या मालिकांची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. अनेक वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या पसंतीत टिकून राहणाऱ्या कथांना ओटीटी विश्वात किती महत्त्व आहे, हे या यशातून अधोरेखित होतं.






