(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
The Paradise Box Office: तेलुगू सुपरस्टार नानीच्या ‘द पॅराडाइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. २४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन-थ्रिलरने पहिल्याच दिवशी जगभरात ७६.९० कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे, ही नानीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. याआधी त्याच्या ‘हिट: द थर्ड केस’ने नोंदवलेला ओपनिंग डेचा विक्रम ‘द पॅराडाइज’ने मागे टाकला आहे.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘द पॅराडाइज’ने पहिल्या दिवशी भारतात ३४.६५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. भारतातील ग्रॉस कलेक्शन ५४.९० कोटी रुपये असून, परदेशातील कमाई २२ कोटी रुपये आहे. त्यामुळे चित्रपटाचा वर्ल्डवाइड कलेक्शन ७६.९० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
चित्रपटाने बुधवारी झालेल्या लिमिटेड प्रिव्ह्यू शोजमधूनही ११.६० कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. त्यामुळे भारतातील एकूण नेट कलेक्शन ४६.२५ कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
नानीच्या आधीच्या सिनेमांचा विक्रम मोडला
‘द पॅराडाइज’ने नानीच्या २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिट: द थर्ड केस’चा ओपनिंग डेचा विक्रम मोडला आहे. ‘हिट: द थर्ड केस’ने पहिल्या दिवशी भारतात सुमारे २१ कोटी रुपयांची नेट कमाई केली होती.
तसेच नानी आणि दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांच्या २०२३ मधील ‘दसरा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात २३.२० कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. ‘द पॅराडाइज’ने या दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत मोठी सुरुवात केली आहे.
मात्र प्रभास आणि राम चरणच्या सिनेमांना मागे टाकता आलं नाही
नानीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला असला तरी, ‘द पॅराडाइज’ची ओपनिंग काही मोठ्या तेलुगू चित्रपटांपेक्षा कमी आहे.
‘द राजा साब’ – भारतात ₹५३.७५ कोटी नेट, जगभरात ₹१००.२० कोटी
‘पेड्डी’ – भारतात ₹५१ कोटी नेट, जगभरात ₹११०.४९ कोटी
‘द पॅराडाइज’ – भारतात ₹३४.६५ कोटी नेट, जगभरात ₹७६.९० कोटी
त्यामुळे नानीच्या वैयक्तिक विक्रमाच्या तुलनेत ही ओपनिंग मोठी असली, तरी या तुलनेत ‘द पॅराडाइज’ला अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे.
हिंदीत ‘द पॅराडाइज’समोर ‘हनुमान अंश’चं आव्हान
‘द पॅराडाइज’ला हिंदी डब व्हर्जनमध्ये मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. गुरुवारी, चित्रपटाच्या पहिल्या दिवशी हिंदी व्हर्जनने २.२५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. दुसरीकडे, ‘हनुमान अंश’ने प्रदर्शनाच्या ४९व्या दिवशीही हिंदी बॉक्स ऑफिसवर ३.६५ कोटी रुपयांची नेट कमाई केली.
‘हनुमान अंश’ची भारतातील एकूण नेट कमाई २८८.३३ कोटी रुपये, तर जगभरातील ग्रॉस कलेक्शन ३७७.०५ कोटी रुपये झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाने ४९व्या दिवशीही ६,७२९ शोजमधून कमाई केली.
हिंदी डब व्हर्जनमध्ये ‘द पॅराडाइज’ची कमाई ‘हनुमान अंश’पेक्षा कमी असली, तरी त्याने ‘मिर्झापूर द मूव्ही’च्या १.५० कोटी रुपयांच्या कमाईला मागे टाकलं आहे. त्यामुळे हिंदी मार्केटमध्ये चित्रपटाची सुरुवात पूर्णपणे निराशाजनक नसली, तरी पुढील दिवसांत त्याची कमाई टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘वाइब’ची सातव्या दिवशी कमाई ९० लाखांवर
दरम्यान, कुणाल खेमू, प्रीती झिंटा आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्या ‘वाइब’ने बॉक्स ऑफिसवर पहिला आठवडा पूर्ण केला आहे. सुमारे ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ११.३५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.
मात्र सातव्या दिवशी चित्रपटाची कमाई एक कोटी रुपयांवरून ९० लाख रुपयांवर आली आहे. आता ‘द वन’, ‘लव्ह लॉटरी’ आणि ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ यांसारख्या नव्या रिलीजमुळे ‘वाइब’च्या शोची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
‘दायरा’ची कमाईही चिंताजनक
दुसरीकडे, करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या ‘दायरा’ची बॉक्स ऑफिसवर आणखी खराब स्थिती आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाने सात दिवसांत केवळ ६.३६ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.
गुरुवारी ‘दायरा’ने फक्त ४१ लाख रुपयांची नेट कमाई केली. त्यामुळे पहिल्या आठवड्यानंतरही चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झालेली दिसत नाही.
शुक्रवार, २५ सप्टेंबरपासून बॉक्स ऑफिसवर आणखी काही नवीन चित्रपट दाखल होत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांचा ‘द वन’, ‘लव्ह लॉटरी’ आणि ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ यांच्यामुळे प्रेक्षकांमध्ये पर्याय वाढणार आहेत. त्यामुळे ‘द पॅराडाइज’च्या पुढील दिवसांच्या कमाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.






