शालार्थ आयडी घोटाळ्यात तब्बल 1200 संशयित आरोपी; 160 कोटींच्या व्यवहाराचा संशय
नाशिक : राज्यभरात गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, या प्रकरणात आतापर्यंत सुमारे १२०० संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात सुमारे १६० कोटी रुपयांच्या या मुख्य घोटाळ्यात नाशिकरोड पोलीस आणि विशेष तपास पथकाने आतापर्यंत ९ प्रमुख संशयितांना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहेत.
यात माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संस्थाचालक दीपक गरुड, सेवानिवृत्त वेतन अधीक्षक राजमोहन शर्मा, प्रशांत वाडीले आणि तुषार साळुंखे यांसारख्या मुख्य सूत्रधारांचा समावेश आहे. मालेगावातील स्वतंत्र बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधार कीर्ती पाथरे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत वेगाने सुरू असून, नाशिक विभागातील माजी उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण आणि शिक्षणाधिकारी किरण किरण कुवर यांना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता (अंतरिम) जामीन मंजूर केला आहे. तसेच, तपासास सहकार्य न करणाऱ्या सुमारे १५० संशयित शिक्षकांची थेट पोलीस चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विदर्भात नागपूर सायबर शाखा आणि विशेष तपास पथकाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत १२ हून अधिक जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन शिक्षणाधिकारी, काही शाळांच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि दलालांचा समावेश आहे. नागपूर सायबर शाखेनेही या प्रकरणात स्वतंत्र कारवाई करत काही महिला शिक्षिका व मुख्याध्यापकांना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातही ७४२ शाळांच्या संचिकांची एसआयटीमार्फत कसून तपासणी सुरू आहे.
नाशिकात 13 आरोपींना बेड्या
नाशिकरोड पोलीस ठाणे आणि विशेष तपास पथकाने आतापर्यंत किमान ११ ते १३ प्रमुख आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. यात नाशिकच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले ९ आरोपी तसेच मालेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक व महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांच्या ताज्या अटकेचा समावेश आहे.
घोटाळ्याचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत
नाशिक, राज्यभरातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. या घोटाळ्यात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील १२ शाळा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याचा गंभीर प्रकार तपासात उघड झाला आहे.
राज्यभरात हजारांवर बनावट शालार्थ आयडी
आतापर्यंत राज्यभरात एक हजारांहून अधिक बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात शिक्षक, संस्थाचालक तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून, अनेक संशयित आरोपी गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात आहेत.
FAQ
1. शालार्थ आयडी घोटाळ्यात किती संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत?
या प्रकरणात आतापर्यंत सुमारे १२०० संशयित आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
2. शालार्थ आयडी घोटाळा किती कोटी रुपयांचा आहे?
नाशिक विभागातील चार जिल्ह्यांमध्ये सुमारे १६० कोटी रुपयांच्या व्यवहारांचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
3. कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा घोटाळा उघडकीस आला आहे?
नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये या घोटाळ्याची व्याप्ती आहे.






