
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Yami Gautam-Aditya Dhar: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार, या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या जोडप्याने मुंबई सोडून हिमाचल प्रदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर शांत आयुष्य जगण्याच्या इच्छेने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, कामानिमित्त या दोघांचं मुंबईत येणं-जाणं सुरू राहणार असल्याचंही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, यामी गौतम आणि आदित्य धर यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील गोहर येथे आपलं कायमस्वरूपी निवासस्थान केलं आहे. यामीचा जन्म हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झाला असून, या राज्याशी तिचं खास नातं आहे. लग्नापूर्वीच यामीने गोहर येथे २५ एकर जमिनीवर असलेलं सुमारे १०० वर्ष जुनं वारसा घर खरेदी केलं होतं. हे घर तिच्या कुटुंबाच्या आणि बालपणीच्या आठवणींशी जोडलेलं आहे.
४ जून २०२१ रोजी यामी आणि आदित्य यांचा विवाह याच ठिकाणी पार पडला होता. लाकूड आणि दगडांपासून बांधलेलं हे घर फळबागांनी आणि हिरवाईने वेढलेलं आहे. येथे सफरचंद, बटाटे, आलुबुखारे आणि आले यांची लागवड केली जाते. या घराचं रूपांतर आलिशान सेलिब्रिटी निवासस्थानात करण्याऐवजी त्याची साधी आणि नैसर्गिक रचना कायम ठेवण्याचा निर्णय या जोडप्याने घेतल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
आदित्य धर हे दिल्लीतील काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मले असून, ते नेहमीच प्रसिद्धीपासून काहीसं दूर राहणं पसंत करतात. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २: द रिव्हेंज’च्या यशानंतर आदित्य यांची लोकप्रियता वाढली असली, तरी ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे दिसत नाहीत. त्यामुळे मुंबईतील मनोरंजनविश्वाच्या झगमगाटापासून दूर हिमाचलमध्ये शांत आयुष्य जगण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं वृत्त आहे.
यामी आणि आदित्य याआधी मुंबईतील खार पश्चिम परिसरात भाड्याच्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. ‘धुरंधर’च्या प्रमोशनदरम्यान आदित्य यांनी आपल्या घराचा उल्लेख करत ‘माझं घर चित्रकार धुरंधर मार्गावर आहे,’ अशी मिश्किल टिप्पणी केली होती. या अपार्टमेंटबाबत नंतर ते विकत घेतल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, हिमाचलला कायमस्वरूपी निवासस्थान बनवल्याच्या वृत्ताला या जोडप्याकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
IC 814: विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित सीरिज पाहिलीत का? ६ एपिसोडमध्ये उलगडणार थरारक सत्यकथा
‘आर्टिकल ३७०’साठी मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
यामी गौतम आणि आदित्य धर नुकतेच गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यात यामीला ‘आर्टिकल ३७०’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर आदित्य धर यांना याच चित्रपटासाठी निर्माते म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.
मुलगा वेदविदला ठेवतात प्रसिद्धीपासून दूर
यामी गौतम आणि आदित्य धर मे २०२४ मध्ये मुलगा वेदविदचे पालक झाले. मात्र, या जोडप्याने आपल्या मुलाला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामीने सप्टेंबर २०२५ मध्ये मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता; मात्र त्यातही तिने वेदविदचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली होती. खासगी आयुष्याबाबत गोपनीयता जपणाऱ्या या जोडप्यासाठी हिमाचल प्रदेशातील घर शांत आणि निवांत आयुष्याचा पर्याय ठरत असल्याचं वृत्त आहे.
Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन