
Gujrat : गिरनंतर बरडा जंगल बनले आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान; १७ सिंहांचा अधिवास
गुजरात (Gujrat ) सरकारच्या वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. गिरच्या जंगलानंतर आता बरडा वन्यजीव अभयारण्य आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान बनत आहे. पोरबंदर आणि देवभूमी द्वारका जिल्ह्यांत पसरलेल्या बरडा जंगलातील डोंगराळ आणि खडकाळ प्रदेश सिंहांसाठी अनुकूल ठरत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, हे अभयारण्य भविष्यात आशियाई सिंहांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी महत्त्वाचे केंद्र बनू शकते.
सौराष्ट्रातील बरडा वन्यजीव अभयारण्य 192.31 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारले आहे. या जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती आणि औषधी वनस्पती आढळतात. सिंहांच्या अधिवासासाठी आवश्यक नैसर्गिक परिस्थिती, पुरेसा शिकारसाठा आणि अनुकूल वातावरण येथे उपलब्ध असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
गुजरात सरकारने सिंहांच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली बरडा जंगलात राहणाऱ्या पशुपालकांच्या पुनर्वसनासाठीही योजना जाहीर करण्यात आली आहे. सुमारे 144 वर्षांनंतर सिंहांनी नैसर्गिकरीत्या या जंगलात पुन्हा अधिवास निर्माण केला. सुरुवातीला एक नर सिंह येथे आला. त्यानंतर गुजरात वन विभागाने 5 मादी सिंहांना या भागात आणले.
बरडा वन्यजीव अभयारण्यात सध्या 17 सिंह असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. सिंहांच्या हालचाली, अधिवासाची निवड आणि आहाराचा अभ्यास करण्यासाठी 6 सिंहांना रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. जानेवारी 2023 ते जुलै 2025 या कालावधीत त्यांच्या 1.69 लाखांहून अधिक जीपीएस लोकेशनची नोंद करण्यात आली. सिंह जंगलातील गवताळ प्रदेशाचा सक्रियपणे वापर करत असून, स्वतःचा अधिवास आणि सामाजिक संबंध विकसित करत असल्याचे संशोधनात आढळले.
‘गिरच्या पलीकडे : आशियाई सिंहांसाठी संभाव्य आश्रयस्थान म्हणून बरडा वन्यजीव अभयारण्य’ या शीर्षकाचा संशोधन अहवाल ‘पीएलओएस वन’ या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. गुजरात वन विभाग आणि कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला.
Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटले! आतापर्यंत 9 जणांनी गमावला जीव, सीएमकडून शांततेचं आवाहन
सिंहांच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी जंगलातील शिकार प्राण्यांची संख्या वाढवण्यावर वन विभाग भर देत आहे. 2025-26 या वर्षात गिर वन्यजीव अभयारण्यातून 441 चितळ बरडा जंगलात सोडण्यात आले. यापूर्वीही 2007 पासून मोठ्या संख्येने चितळ येथे सोडण्यात आले आहेत. याशिवाय सांबरांची संख्या वाढवून त्यांनाही जंगलात सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सिंहांच्या हालचाली आणि आरोग्यावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी आठ पूर्णवेळ सिंह ट्रॅकर्स नियुक्त करण्यात आले आहेत. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी त्वरित प्रतिसाद यंत्रणाही अधिक मजबूत करण्यात आली आहे.
बरडा अभयारण्यात 2024 मध्ये पर्यावरणपूरक पर्यटनाला सुरुवात करण्यात आली. त्यातून स्थानिक नागरिकांना नेचर गाइड आणि सफारी ऑपरेटर म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या पहिल्या वर्षातील 2,271 वरून 2025-26 मध्ये 3,359 झाली. ही वाढ सुमारे 48 टक्के आहे.
गुजरात सरकारच्या संवर्धन उपक्रमांमुळे सिंहांसाठी पर्यायी अधिवास विकसित होण्याबरोबरच स्थानिक रोजगार आणि पर्यटनालाही चालना मिळत असल्याचे या घडामोडींवरून दिसून येते.