औरंगाबाद – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने “हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ते १५ आगस्टदरम्यान घरांवर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी झेंडे तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेने अंकित कॅाटेजला दिले आहे. त्यानुसार १ आगस्टपासून सिडको एन-१ येथे १५० महिला दररोज ५० हजार झेंडे तयार करत आहेत. त्यांना १० आगस्टपर्यंत ७ लाख तिरंगे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
संपूर्ण भारताला झेंड्यासाठी लागणारे कापड सुरतमधूनच वितरित होत आहे. २० इंच रुंदी आणि ३० इंच लांबीचा झेंडा नागरिकांना २९ रुपयांत मिळेल. तो ग्रामपंचायत, नगरपालिका, मनपामार्फत लोकांना २९ रुपयांत वितरित केला जाईल. अंकित काॅटेजचे प्रमुख मनोहर अग्रवाल यांनी सांगितले की, सुरत येथून झेंड्यासाठी तीन लाख २५ हजार मीटर कापड ट्रकमध्ये लादून आणले.
या कामात कुणाल ठोले, रवींद्र बडे यांचाही सहभाग आहे. एका शिफ्टमध्ये साठ ते सत्तर महिला व पुरुष असे तीन शिफ्टमध्ये झेंडे तयार होत आहेत. एकाच वेळी २०० जणांचे हात निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. कामकऱ्यांना दररोज ५०० ते ७०० रुपये मिळत आहेत.