तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये फटाक्यांच्या दोन कारखान्यांमध्ये स्फोट, 11 जणांचा मृत्यू!

फटाके आणि आगपेटीचे कारखाने असलेल्या शिवकाशीमध्ये नमुना चाचणी दरम्यान हा स्फोट झाला.

    तामिळनाडूतील शिवकाशी येथे मंगळवारी दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये स्फोट झाला. या घटनेत  11 जणांचा मृत्यू झाला तसेच अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. या स्फोटात दोन जण जखमीही झाले आहेत. फटाके आणि आगपेटीचे कारखाने असलेल्या शिवकाशीमध्ये नमुना चाचणी दरम्यान हा स्फोट झाला.

    शिवकाशी पोलिसांनी सांगितले की, फटाके आणि मॅचस्टिक युनिट्स वैध परवान्यांसाठी तपासले जात आहेत. कोणाकडे वैध परवाना आहे आणि कोणाकडे नाही हे पोलीस तपासत होते. खरे तर दिवाळी जसजशी जवळ येते तसतशी देशभरात फटाक्यांची मागणी वाढते. शिवकाशी हे फटाक्यांसाठी देशभरातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. तामिळनाडूतील कारखान्यांमध्ये सध्या फटाक्यांचे उत्पादन वाढले आहे. अशातच फटाके आणि आगपेटीचे कारखाने असलेल्या शिवकाशीमध्ये नमुना चाचणी दरम्यान हा स्फोट झाला.

    मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली नुकसान भरपाई

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्टॅलिन यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

    ९ ऑक्टोबरलाही दहा जणांचा मृत्यू झाला होता

    9 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला होता.