ह्रदयद्रावक! चार मुलांसह आईने रेल्वे स्टेशनवर केलं पिष प्राशन, ३ चिमुकल्यांचा मृत्यू
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रफीगंज रेल्वे स्टेशनवर एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ४ मुलांसह महिलेने भर स्टेशनवर विष प्राशन केलं. यात तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर महिला आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सध्या रेल्वे पोलिसांच्या देखरेखीखाली तिन्ही मृतदेह सोननगर येथे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तर मायलेकरावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये १ वर्षाची राधा, २ वर्षाची सूर्यमणी आणि ३ वर्षाची शिवानी यांचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनवर वेदनेने तडफडताना ४ मुलं आणि एका महिला आढळून आली होती. हे दृश्य पाहून स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. लोकांना काही समजण्यापूर्वीच प्रकृती बिघडू लागली. त्यानंतर रेल्वे पोलिस दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्वांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी ताखल केलं. मात्र डॉक्टरांनी तीन मुलांना मृत घोषित केलं. महिलेला आणि एका मुलाला प्राथमिक उपचारानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
महिलेचे नाव सोनिया देवी असे आहे. ती बांदेया पोलीस स्टेशन परिसरातील झिकाटिया गावातील रहिवासी असून रवी बिंद यांची पत्नी आहे. काही कारणास्तव पतीशी सोनिया देवीचं भाडंण झालं होतं. त्यानंतर रागाच्या भरात तिने टोकाचं पाऊल उचललं आणि मुलांसह स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. यात तीन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती, सीएचसीचे प्रभारी डॉ. अरविंद कुमार यांनी दिली.