filer photo
पणजी : गोव्यातील कोलवल मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी रावणाचा पुतळा दहन करत दसरा साजरा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चार तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी शुक्रवारी उत्तर गोव्यातील कोलवल मध्यवर्ती कारागृहात तैनात सहायक अधीक्षक चंद्रकांत हरिजन, तुरुंगाधिकारी महेश फडते आणि अनिल गावकर आणि सहायक कारागृह रामनाथ गावडे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
[read_also content=”तेजसची झेप किती मोठी? जाणून घ्या कंगनाच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शन! https://www.navarashtra.com/movies/tejas-movie-first-day-box-office-collection-nrps-474825.html”]
सूत्रांनी सांगितले की, सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये कैदी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कारागृहाच्या आवारात फटाक्यांसह रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना दिसत आहेत. दसरा उत्सवात रावणाच्या पुतळ्याचे देशभर दहन केले जाते. यंदा 24 ऑक्टोबरला दसरा साजरा करण्यात आला.
एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, कैद्यांना पूर्वपरवानगीशिवाय पुतळे बनवण्याची परवानगी कशी दिली गेली याचे उत्तर तुरुंग अधिकाऱ्यांना द्यावे लागेल. कारागृहाच्या आवारात मोबाईल फोनला परवानगी कशी देण्यात आली याचाही तपास केला जाईल.” ते म्हणाले की, या घटनेतून कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणासाठी तुरुंग अधिकाऱ्यांना प्रामुख्याने जबाबदार धरण्यात आले आहे, त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.






