घरी एसी (air conditioner) लावून झोपणाऱ्यांनो जरा सावधान! कारण गर्मीपासून बचाव करण्यासाठी घरात एसी लावणं तुम्हाला महागात पडू शकतं. जीवाची काहीली कमी करणारा हा एसी जीवही घेऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे या एसीमुळे एकाच कुटुंबातील चार जणांना जीव गमवावा लागल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील द्वारका शहरात घराचा एसी जास्त तापल्याने आग लागली. आग घरभर पसरली आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. आणखी एका व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अथक प्रयत्नानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
[read_also content=”स्लो पॉइझन की हार्ट अटॅक? मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचं आता उघड होणार, व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला प्रयोगशाळेत! https://www.navarashtra.com/india/mukhtar-ansari-visera-send-to-labortory-to-his-actuaal-death-death-cause-wil-519483.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात घराला लागलेल्या आगीत एका मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. पवन उपाध्याय (३९), त्यांची पत्नी तिथी (२९), मुलगी ध्यान आणि आई भवानीबेन (६९) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलीस निरीक्षक टी.सी. पटेल यांनी सांगितले की, द्वारका शहरातील आदित्य रोडवर असलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावर रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागली, त्यावेळी कुटुंबातील पाच सदस्य झोपले होते. आग लागल्यानंतर घराचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरातील सदस्यांना अंधारामुळे दरवाजा सापडला नाही, त्यामुळे ते बाहेर पडू शकले नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान, घरात धुरामुळे एक व्यक्ती, त्याची पत्नी, त्याची 8 महिन्यांची मुलगी आणि तिची आई घराच्या पहिल्या मजल्यावर बेशुद्ध पडून होत्या. त्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पटेल यांनी सांगितले की, त्या व्यक्तीची आजी घराच्या तळमजल्यावर एका खोलीत झोपली होती आणि ती सुखरूप बाहेर पडली. एअर कंडिशनर गरम झाल्यानंतर स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, फॉरेन्सिक तज्ञ आगीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.






