तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई येथे भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू!

सर्व लोक एका लग्न समारंभातून घरी परतत होते. महामार्गावर लॅारी आली असता समोरून येणाऱ्या कारला या लॅारीची जोरदार धडक बसली

    तिरुवन्नमलाई: तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई (Tiruvannamalai) जिल्ह्यातील चेंगमजवळ (Chengam) रविवारी एक भीषण रस्ता अपघात (Tragic Road accident ) झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. कार आणि लॉरी यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील सातही जण जागीच ठार झाले. वृत्त लिहेपर्यंत मृतांची ओळख पटू शकली नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक एका लग्न समारंभातून घरी परतत होते. महामार्गावर लॅारी आली असता समोरून येणाऱ्या कारला या लॅारीची जोरदार धडक बसली. या अपघातात लॉरी चालकाचा जीव वाचला असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या पोलिसांनी लॉरी चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघाताचा तपास चेंगम पोलीस करत आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    गाडी ओव्हर स्पीडमध्ये होती

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवान कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.