‘कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात हायवेई ली, योंगलिंग झाओ, चेंगहाओ वांग, डायना उर्गे-व्होर्सात्झ, यान कार्मेलिएट आणि रोनीता बर्धन यांनी जगभरातील शहरी वृक्षांच्या उष्णता कमी करण्याच्या क्षमतेचे विश्लेषण केले आहे. या अभ्यासात उष्णकटिबंधीय, कोरडे, समशीतोष्ण आणि खंडीय अशा विविध हवामान प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, नियोजनपूर्वक वृक्षलागवड केल्यास अभ्यासातील ८३ टक्के शहरांमध्ये सर्वाधिक उष्ण महिन्याचे तापमान २६ अंश सेल्सिअसच्या खाली आणणे शक्य असल्याचे आढळले. काही शहरांमध्ये पादचारी पातळीवरील तापमान तब्बल १२ अंशांनी कमी झाल्याची नोंदही आहे.
झाडे थंडावा कसा निर्माण करतात?
संशोधनानुसार झाडे तीन प्रमुख प्रक्रियांमुळे शहराला गारवा देतात. ती रस्ते व इमारतींवर थेट सूर्यप्रकाश रोखून सावली निर्माण करतात; पानांमधील बाष्पोत्सर्जनामुळे आसपासची हवा थंड होते; तसेच झाडांची मांडणी वाऱ्याच्या प्रवाहावर परिणाम करून उष्णतेचे वितरण बदलते. या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम पादचारी अनुभवत असलेल्या तापमानावर होतो. विशेष म्हणजे पार्श्वभूमीचे तापमान वाढत असताना झाडांचा शीतल परिणामही अधिक प्रभावी होत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. त्यामुळे उष्णतेच्या तीव्र दिवसांत
अधिक महत्त्वाची ठरते.
सह्याद्री फुलला! रानफुलांचा रंगोत्सव बहरला; काळ्याकभिन्न कातळांवरील हिरव्या गालिच्यावर…
‘एकाच जातीची’ नव्हे, मिश्र वृक्षलागवड प्रभावी!
अभ्यासात १२० हून अधिक वृक्षप्रजातींचा संदर्भ आढळला. समशीतोष्ण हवामानात पानझडी आणि सदाहरित झाडांचे मिश्रण एकाच प्रजातीच्या वृक्षलागवडीपेक्षा सुमारे ०.५ अंशांनी अधिक गारवा निर्माण करते. मोठी व पसरट छत्री असलेली झाडे मोकळ्या भागात प्रभावी सावली देतात, तर वर्षभर पर्णसंभार टिकवणारी सदाहरित झाडे काही भागांत सातत्याने शीतल परिणाम देतात.
अतिउष्ण हवामानात झाडांच्या पानांवरील रंध्रे बंद झाल्यास बाष्पोत्सर्जन कमी होते आणि थंडावा घटतो. तसेच अतिदाट वृक्षछत्रीमुळे हवेचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला, तर काही अरुंद रस्त्यांमध्ये उष्णतेची अनुभूती वाढू शकते. रात्री झाडांच्या दाट छत्रीत दीर्घतरंग उष्णता अडकल्याने शीतल परिणाम मर्यादित राहण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहर समशीतोष्ण हवामान गटात मोडते. या गटातील निष्कर्षांनुसार दाट बांधकाम असलेल्या भागांमध्ये झाडांमुळे कमाल तापमान सरासरी १.४२ अंशांनी, तर मोकळ्या शहरी भागांमध्ये २.०७ अंशांनी कमी होऊ शकते. म्हणजेच नदीकाठ, रुंद रस्ते, पदपथ, सार्वजनिक मैदाने आणि कमी घनतेच्या वसाहतींमध्ये नियोजित हरितीकरणाचा परिणाम अधिक प्रभावी ठरू शकतो.
पुण्यात अलीकडच्या वर्षांत उष्णतेच्या लाटा, वाढते डांबरीकरण आणि झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे ‘अर्बन हीट आयलंड’चा प्रभाव वाढत असल्याचे विविध अभ्यासांतूनही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वृक्षलागवड धोरणात केवळ झाडांची संख्या न मोजता त्यांच्या सावलीची क्षमता, स्थानिक हवामानाशी सुसंगती आणि रस्त्यांच्या रचनेचा विचार करण्याची गरज संशोधनाने अधोरेखित केली आहे.
‘भविष्यातील पुण्यासाठी वृक्षलागवड ही केवळ सौंदर्यीकरणाची योजना न राहता हवामान बदलाशी जुळवून घेणारे पायाभूत धोरण ठरले पाहिजे. स्थानिक हवामानाला अनुरूप वृक्षनियोजन केल्यास उष्णतेचा परिणाम लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतो. त्यामुळे ‘देशी की विदेशी झाडे लावावीत’ यापेक्षा ‘योग्य झाड, योग्य जागा आणि स्थानिक हवामान’ हेच शहरी थंडाव्याचे वैज्ञानिक सूत्र आहे.
– श्रीकांत इंगळहळीकर, वनस्पती अभ्यासक
मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू
पुणे शहराची हरित संपदा (अधिकृत नोंद) –
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षसंपदा –
एकूण वनक्षेत्र – १,७०१.५८ हेक्टर
एकूण झाडे – ५७,८१,५७८ वृक्ष
वृक्ष प्रजाती – ४१७ प्रजाती
वनस्पती कुळे – ७३ कुळे
दुर्मिळ प्रजाती – ११५ प्रजाती
क्षेत्रीय कार्यालये – १५ कार्यालये
सर्वाधिक आढळणारी वृक्ष प्रजाती – गिरीपुष्प