फोटो सौजन्य सोशल मीडिया
Satara News : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्वोदय सेवा ट्रस्ट, वाई यांच्या वतीने मौजे वेलंग येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, ‘घर-घर वृक्षारोपण’ अभियान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व मानाचा फेटा देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सातारा पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात; शंभूराज देसाईंची सावध भूमिका
‘घर-घर तिरंगा’च्या धर्तीवर ट्रस्टच्या वतीने ‘घर-घर वृक्षारोपण’ ही पर्यावरणपूरक संकल्पना राबविण्यात आली. याअंतर्गत ग्रामस्थांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील प्राथमिक शाळा व भैरवनाथ ग्रामदैवत मंदिर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
नांदगणे येथील न्यू इंग्लिश स्कूल भागशाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप सर्वोदय सेवा ट्रस्टचे संचालक नंदकिशोर गायकवाड व संस्थेचे सभासद जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वेलंग येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमास सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय जेधे, उपाध्यक्ष प्रकाश वाडकर, संचालक किशोर महांगडे, रामदास राऊत, पांडुरंग भिलारे, शिवाजी धनवडे, सुनील गोळे, दत्तात्रय मांढरे, माळवदे, आनंदा शेलार, विजयानंद पवार, चंदुकाका सराफ वाई शाखेचे शिंदे सर, सरपंच लक्ष्मी जेधे-गुळूंबकर, पोलीस पाटील सविता जेधे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष रमेशदादा गोळे, उपाध्यक्ष विजयआबा जेधे, माजी सैनिक नामदेव जेधे, शिवाजी पार्टे, विष्णु काकडे, सुरेश जेधे, पत्रकार विकास जाधव, मुख्याध्यापक मोहिते सर, कुलकर्णी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
Satara Politics : जावळीत संघर्षाची ठिणगी ; शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे !
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी, महिला भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक सेवा, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार अध्यक्ष संजय जेधे यांनी मानले. सर्वोदय सेवा ट्रस्टच्या या उपक्रमातून ‘ज्येष्ठांचा सन्मान, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि पर्यावरणाचे संवर्धन’ असा समाजहिताचा त्रिसूत्री संदेश देण्यात आला.