भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.संपूर्ण भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात तिरंगा अभिमानाने फडकला. संपूर्ण देशात स्वातंत्र्याची लाट आली होती. देशभरात तिरंगा फडकावण्यातआला. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात असे एक शहर होते जिथे त्या दिवशी तिरंगा फडकवण्यात आला नव्हता? स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी या शहरात तिरंगा नव्हे तर वेगळा ध्वज फडकवण्यात आला होता.
शेवटच्या मुघल सम्राट औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद शहर हे महाराष्ट्राचे पर्यटन स्थळ म्हणून आज संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळात हैदराबाद राज्याचा भाग असलेले हे शहर १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्राचा भाग बनले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी, जेव्हा संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना हैदराबाद राज्य निजामाच्या ताब्यात होते. निजाम उस्मान अली खान यांनी भारतात विलीन होण्यास नकार देत त्यांचे राज्य स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्या दिवशी हैदराबादमध्ये तिरंगा न फडकावता निजामाचा ध्वज ‘असफिया’ फडकवण्यात आला.
हैदराबाद हे त्या संस्थानांपैकी एक होते ज्यांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा पर्याय होता. निजामाने स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केल्याने १५ ऑगस्ट १९४७ रोजी आणि १९४८ मध्येही हैदराबादमध्ये तिरंगा फडकवण्यात आला नाही. त्यामुळे स्थानिक लोक स्वातंत्र्याच्या उत्सवापासून वंचित राहिले. त्या काळात हैदराबादचा अधिकृत ध्वज असफिया ध्वज म्हणून ओळखला जात असे. पिवळ्या पार्श्वभूमीवर हिरवा आणि पांढरा डिझाइन असलेला हा ध्वज राज्याची ओळख होता. मात्र, स्वातंत्र्याची तीव्र इच्छा बाळगणाऱ्या स्थानिकांनी निजामाविरुद्ध आवाज उठवला. अनेक संघटना आणि स्वातंत्र्यसैनिकांनी या राजवटीला विरोध करत आंदोलन उभारले.
स्वातंत्र्यानंतर सुमारे एक वर्ष हैदराबाद भारताचा भाग नव्हते. २१ जून १९४८ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांच्या राजीनाम्यानंतर तत्कालीन उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी धाडसी निर्णय घेतला. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ राबवून हैदराबादचे भारतात विलिनीकरण केले. त्यानंतरच हैदराबादमध्ये पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला.