संग्रहित फोटो
तासगाव : तासगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तासगावच्या मध्यवर्ती बसस्थानक चौकात दुपारची गर्दी… वाहनांचा कलकलाट, हॉर्नचा आवाज, आणि उन्हाच्या तडाख्यात उभ्या असलेल्या महिला वाहतूक पोलिस नेहमीप्रमाणे वाहतुकीची शिस्त राखण्याचा प्रयत्न करत होत्या. पण याच वेळी, एका चारचाकी वाहनातून उतरलेल्या तरुणाने भर चौकात गोंधळ घातला. महिला पोलिसाशी गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जत तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल दिपाली उत्तम खरात या सोमवारी 12.30 वाजताच्या दरम्यान बसस्थानक चौकात आपले कर्तव्य बजावत होत्या. त्याचवेळी अमोल विष्णु काळे (वय 30, रा. काशलींगवाडी, ता. जत, जि. सांगली) हा MH-05-AJ-9977 क्रमांकाच्या मारुती सुझुकी कारसह आला. यावेळी खरात यांनी काळे याची गाडी थांबवली. मात्र गाडी का थांबवली असे म्हणत काळे याने खरात यांच्याशी गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणत, लोकांसमोर पोलिसांबद्दल चुकीचा संदेश जाईल, असे वक्तव्य केले.
यावेळी काळे याने पोलिसांविषयी द्वेष आणि आकस निर्माण होईल अशी भाषा वापरली, तसेच ‘पोलिस गैरकृत्य करीत आहेत’ असा खोटा भास लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार केवळ महिला पोलिसांचा अपमानच नाही, तर संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिमेवर डाग आहे, असे पोलिसांचे मत आहे. भरचौकात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. याप्रकरणी खरात यांनी काळे याच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार अमोल काळे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांशी गैरवर्तन खपवून घेणार नाही : सोमनाथ वाघ
शासकीय कामात अडथळा आणणारे, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिला आहे. तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुण्यात वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण
हेल्या काही महिन्याखाली पुणे शहर पोलीस बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असताना हडपसर भागात मात्र, पदपथावर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी धक्काबुक्की करून चप्पलेने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.