
राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली; AQI पोहोचला 400 च्या वर, श्वास घेण्यास अडचण
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या कमी होताना दिसत नाही. रविवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट श्रेणीत नोंदवली गेली. त्याआधी शनिवारीही हवेची गुणवत्ता खूपच खराब राहिली. रविवारी सकाळी राजधानीत धुक्याची जणू चादरच पसरली होती. ज्यामुळे दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली. दिल्लीसाठीच्या एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीमनुसार, अनेक भागात AQI ४०० च्या वर नोंदवला गेला, जो अत्यंत वाईट श्रेणीत येतो.
विषारी धुक्याच्या थराने आनंद विहार परिसरात व्यापला आहे, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानीवर परिणाम झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, आनंद विहारमधील हवेची गुणवत्ता निर्देशांक ४४५ नोंदवला गेला होता, जो गंभीर श्रेणीत येतो. चांदणी चौकात AQI ४१५, द्वारका ४०४, आयजीआय विमानतळ परिसरात ३२१, आयटीओ ४०३ आणि विवेक विहारमध्ये ४२८ नोंदवले गेले.
हेदेखील वाचा : Delhi Air Pollution : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता फक्त ‘या’ वाहनांनाच एंट्री
जर हवा स्वच्छ असेल तर ती ० ते ५० दरम्यानच्या निर्देशांकाद्वारे दर्शविली जाते. निर्देशांक ५१ ते १०० दरम्यान असताना हवेची गुणवत्ता समाधानकारक मानली जाते. १०१-२०० मध्यम वायू प्रदूषण दर्शवते, तर २०१-३०० खराब हवेची गुणवत्ता दर्शवते आणि ३०१-४०० अतिशय खराब हवेची गुणवत्ता दर्शवते. ४०१ ते ५०० दरम्यान असताना हवेची गुणवत्ता गंभीर होते. अशा परिस्थिती मानवी आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात, आधीच आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी घातक ठरू शकतात.
देहरादूनची परिस्थितीही चिंताजनक
जर तुम्ही दिल्लीच्या विषारी वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी देहरादूनला जाण्याचा विचार करत असाल तर दोनदा विचार करा. उत्तराखंडच्या राजधानीतील हवेची गुणवत्ता देखील चिंताजनक आहे. देहरादूनचा AQI जवळपास 300 वर पोहोचला आहे. दाट धुक्यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होईल असा हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी, यमुना एक्सप्रेसवेवर, शून्य दृश्यमानतेमुळे, 19 वाहनांची टक्कर झाली, मोठी आग लागली आणि 16 लोक गंभीरपणे जखमी झाले होते.
फक्त BS-6 वाहनांना दिल्लीत प्रवेश
राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी आणखी वाढताना दिसत आहे. दिल्लीत विषारी धुराचे दाट आवरण असल्याने, प्रदूषण नियंत्रण उपाय आणखी कडक करण्यात आले आहेत. फक्त BS-6 वाहनांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी आहे. वैध प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र नसलेल्या पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली आहे.