chanda kochar

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली अटक मनमानी पद्धतीने आणि कायद्याचा विचार न करता केली होती.

    मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली अटक मनमानी पद्धतीने आणि कायद्याचा विचार न करता केली होती. या प्रकरणी सीबीआयने अधिकाराचा गैरवापर केला, असे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदविले आहे.

    न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने 6 फेब्रुवारी रोजी कोचर यांची अटक बेकायदेशीर ठरवली होती आणि जानेवारी 2023 मध्ये त्यांना जामीन मंजूर करणाऱ्या अन्य खंडपीठाने दिलेल्या अंतरिम आदेशाची पुष्टी केली होती. न्यायालयाचा हा आदेश सोमवारी उपलब्ध झाला.

    आदेशात नेमकं काय?

    कोचर दाम्पत्याच्या अटकेचा कोणत्या आधारे निर्णय घेतला? हे सीबीआय सिद्ध करु शकले नाही. यामुळे ही अटक बेकायदेशीर आहे. कायद्याचा विचार न करता अशी अटक म्हणजे अधिकाराचा दुरुपयोग आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोचर तपासात सहकार्य करत नसल्यामुळे अटक करण्यात आल्याचा तपास एजन्सीचा दावाही न्यायालयाने फेटाळला आणि संशयितांना चौकशीदरम्यान मौन बाळगण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.