
NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक
Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. फरक्का जल कराराच्या मुद्द्यावर JDUकडून आक्रमक भूमिका मांडली जात असतानाच मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी भाजप कोट्यातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे भाजप कोट्यातील सर्व मंत्र्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे मंत्री सध्या पाटणा किंवा बिहारच्या बाहेर आहेत, त्यांनाही तातडीने पाटण्यात बैठकीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे अचानक बोलावण्यात आलेल्या या बैठकीने बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पक्षाच्या पातळीवर या बैठकीचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या तयारीशी जोडला जात आहे. मात्र बिहारमधील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता बैठकीच्या वेळेबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. विशेषतः JDUने फरक्का जल कराराच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका आणि राज्यसभा खासदार संजय झा यांचे वक्तव्य यानंतर ही बैठक होत असल्याने त्याकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जात आहे.
JDUकडून बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये ‘फरक्का जल संधि पर नीतीश संवाद’ कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. बेगूसरायमधील अशाच एका कार्यक्रमात संजय झा यांनी फरक्का कराराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. “सत्ता रहे या ना रहे, बिहार के पानी से समझौता नहीं करेंगे,” अशी भूमिका त्यांनी मांडल्याची माहिती आहे. या वक्तव्यानंतर बिहारमध्ये JDU आणि BJPच्या भूमिकांबाबत राजकीय चर्चा सुरू झाली.
संजय झा यांच्या म्हणण्यानुसार, 1996 पासून फरक्का जल कराराच्या मुद्द्यावर बिहारवर अन्याय होत आहे. पावसाळ्यात बिहारमधील अनेक भागांना पुराचा सामना करावा लागतो, तर राज्याला पाण्याची आवश्यकता असताना अपेक्षित प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे फरक्का जल कराराच्या पुनर्विचाराचा मुद्दा JDUकडून अधिक आक्रमकपणे पुढे आणला जात आहे. या मुद्द्यावरून केंद्रातील NDA सरकारसमोरही राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
बिहारमध्ये NDA सरकारमध्ये BJP आणि JDU हे प्रमुख घटक आहेत. अशा परिस्थितीत JDUच्या वरिष्ठ नेत्याकडून ‘सत्ता रहे या ना रहे’ असे वक्तव्य आल्यानंतर राजकीय निरीक्षकांचे लक्ष दोन्ही पक्षांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केवळ भाजप कोट्यातील मंत्र्यांची बैठक बोलावल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र ही बैठक NDAमधील मतभेदांशीच संबंधित आहे, असे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
भाजपचे सर्व मंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याने या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, फरक्का जल कराराबाबत भाजपची भूमिका काय असणार आणि JDUच्या वक्तव्यांवर चर्चा होते का, याकडे बिहारच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या बैठकीमागे पक्षाच्या आगामी कार्यक्रमांची तयारी हे कारण सांगितले जात असले, तरी बिहारमधील बदलत्या राजकीय वातावरणामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतात 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागितले उत्तर