
ravindra chavan kokan tour
पुण्यात भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडल्यानंतर आता जिल्हानिहाय संघटन मजबूत करण्यावर पक्षाने जोर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचा एकदिवसीय दौरा केला. या दौऱ्यात सावंतवाडी आणि रत्नागिरी येथे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका पार पडल्या. बैठकींमुळे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला.
सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक, तर रत्नागिरी येथे दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी आगामी संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना थेट मैदानात उतरण्याचं आवाहन केलं.
पक्षाचं खरं बळ हे बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये आहे, यावर रविंद्र चव्हाण यांनी भर दिला. तन, मन, धन अर्पण करून पक्षासाठी काम करा आणि प्रत्येक गावात मजबूत संघटन उभं करा, असा संदेश त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासकामं आणि सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जनतेशी सतत संपर्कात राहून सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवा, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
कणकवली आणि रत्नागिरी येथील भाजपा भवनच्या उभारणीच्या कामाची रविंद्र चव्हाण यांनी पाहणी केली. ही कार्यालयं फक्त पक्षाचं कामकाज चालवण्याची ठिकाणं न राहता कार्यकर्त्यांचं ऊर्जाकेंद्र आणि जनतेच्या अपेक्षांचं व्यासपीठ बनावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
S.I.R., सेवा संकल्प अभियान आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्ग यांसारख्या विविध संघटनात्मक विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण आणि वैचारिक बांधणीवर विशेष भर देण्यात आला.
दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाण यांनी रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयांना सदिच्छा भेट दिली. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी उत्तर रत्नागिरीतील विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या भागात भाजपची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. या दौऱ्यात मंत्री नितेश राणे, आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या आगामी संघटनात्मक वाटचालीला दिशा मिळाल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं. स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि बूथ पातळीवरील संघटन यांची सांगड घालत ‘शत-प्रतिशत भाजप’चं लक्ष्य गाठण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.