
Cockroach Janta Party, CJP Analysis, Digital Movement, Social Media Satire
Cockroach Janta Party: देशभरात सध्या ‘झुरळ जनता पार्टी’ (CJP) या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि इन्स्टाग्रामवर अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स मिळवत ही व्यंगात्मक डिजिटल चळवळ तरुणांमध्ये लोकप्रिय ठरताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पक्षाभोवती आता ज्योतिषीय भविष्यवाणी, राजकीय शक्यता आणि Gen-Z पिढीच्या असंतोषावरही मोठा वाद रंगताना दिसत आहे.
१६ मे २०२६ रोजी रात्री ११:३७ वाजता नवी दिल्लीमध्ये X वर टाकलेल्या एका पोस्टमधून ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सुरुवात झाली. कोणतेही कार्यालय, झेंडा किंवा निवडणूक चिन्ह नसताना फक्त एक X पोस्ट आणि Google Form च्या माध्यमातून या व्यंगात्मक पक्षाची घोषणा करण्यात आली. अवघ्या पाच दिवसांत या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात असून, सोशल मीडियावर ५६ लाख फॉलोअर्स आणि एक लाखांहून अधिक सदस्य जोडल्याचा दावा करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशी सुर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर या पक्षाची घोषण करण्यात आली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांविषयी झुरळ आणि परजीवी’ अशा शब्दांचा उल्लेख केल्याचे केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नंतर न्यायालयाकडून या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी तोपर्यंत सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी X वर “बाहेर असलेल्या सर्व झुरळांसाठी नवीन प्लॅटफॉर्म सुरू करत आहोत” अशी पोस्ट केली आणि त्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ देशभर चर्चेत आली.
मुळचे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दीपके हे पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठ मधून पब्लिक रिलेशन्स विषयात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. ते पूर्वी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीमशी संबंधित होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान व्हायरल झालेल्या अनेक मीम मोहिमांमध्ये त्यांची भूमिका असल्याची चर्चा होती.
२१ मे रोजी ‘@CJP_2029’ हे X अकाउंट भारतात ‘Account Withheld in IN’ असे दिसू लागले. कायदेशीर मागणीच्या आधारे हे अकाउंट रोखण्यात आल्याचे सांगितले गेले. या कारवाईनंतर सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, डिजिटल व्यंग आणि आंदोलनांवर नव्याने चर्चा सुरू झाली. दरम्यान, महुआ मोइत्रा आणि प्रशांत भूषण यांच्यासह काही प्रसिद्ध व्यक्तींनी या मोहिमेला सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला.
या पक्षाबाबत सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे त्याची कथित ज्योतिषीय कुंडली. काही ज्योतिष अभ्यासकांनी १६ मे २०२६ रोजी रात्री ११:३७ वाजताच्या वेळेनुसार या पक्षाची कुंडली तयार केल्याचा दावा केला आहे. या विश्लेषणानुसार, मकर लग्न आणि वृषभ राशीतील उच्च चंद्रामुळे जनमानसाशी वेगाने जोडले जाण्याची क्षमता या मोहिमेत असल्याचे सांगितले जात आहे. बुध-आदित्य योगामुळे सोशल मीडिया, मीम्स आणि डिजिटल संवादात ही चळवळ प्रभावी ठरत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तसेच २०२८-२९ पर्यंत ही मोहीम संघटित राजकीय शक्तीत रूपांतरित होऊ शकते आणि भविष्यात निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची शक्यता असल्याच्याही चर्चा रंगत आहेत. मात्र या सर्व दाव्यांना कोणताही अधिकृत किंवा वैज्ञानिक आधार नसून ते सोशल मीडियावरील चर्चेचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.
काही ज्योतिषीय विश्लेषणांमध्ये २०२७ ते २०२९ हा कालावधी या चळवळीसाठी कठीण ठरू शकतो, असेही म्हटले जात आहे. या काळात कायदेशीर दबाव, राजकीय संघर्ष, अंतर्गत मतभेद आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे सर्व दावे वैयक्तिक ज्योतिषीय मतांवर आधारित असून त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
‘झुरळ जनता पार्टी’ सुरुवातीला केवळ व्यंगात्मक सोशल मीडिया मोहिम म्हणून समोर आली असली, तरी बेरोजगारी, पेपर लीक, स्पर्धा परीक्षांतील गोंधळ, मानसिक ताण आणि व्यवस्थेविषयीचा वाढता असंतोष हे मुद्दे या माध्यमातून पुढे आले आहेत. विशेषतः Gen-Z पिढीमध्ये या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून, सोशल मीडिया हे आता केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून आंदोलन, व्यंग आणि राजकीय संवादाचे प्रभावी व्यासपीठ बनत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.