Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन
Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. CJPचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्यात आले आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतातील स्थानिक नियम, न्यायालयाचे आदेश किंवा कायदेशीर तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती इन्टाग्रामकडून देण्यात आली आहे. संस्थापक अभिजीत दीपके यांनीही त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून सीजेपीच्या खात्यावरील बंदीची घोषणा केली.
सीजेपीने सहा दिवसांत सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवले . सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या देशातील तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देशात कॉकरोच जनता पार्टीची मोहिम सुरू झाली. बघता बघता अवघ्या सहा दिवसांतच भाजपपेक्षाही जास्त तरूण या मोहिमेत सहभागी झाले. देशातील सत्ताधारी भाजप विरोधात देशभरात कॉकरोच जनता पार्टीने रान उठवले. पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२:५५ पर्यंत, इंस्टाग्रामवर ही संख्या १.२६ कोटींवर पोहोचली होती. भाजपचे ८७ लाख फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे १.३३ कोटी फॉलोअर्स आहेत.
दुपारी १२ वाजता, पक्षाचे इंस्टाग्रामवर अंदाजे १,९३,००० फॉलोअर्स होते, पण आता इंस्टाग्रामने भारतातील पक्षाचे खाते बंद केले आहे. पक्षाचे फेसबुक खाते नाही. CJP चे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिजीत म्हणाले की, मी जसा विचार केला होता, नेमके तेच घडले.” याचदरम्यान दिपके यांनी त्यांच्या पक्षासाठी एक घोषवाक्यही आणि लोगोही तयार केला आहे. “धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी.” असे घोषवाक्य असून त्याचा लोगोही तयार करण्यात आला होता.
सीजेपीच्या जाहीरनाम्यात राजकीय पक्षांतरावर कठोर भूमिका घेतली आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार किंवा खासदारांना २० वर्षे निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
तसेच, केंद्र आणि राज्यातील कॅबिनेट मंत्रीपदांपैकी ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. माध्यम स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भूमिका घेत अंबानी आणि अदानी समूहांच्या मालकीच्या माध्यम संस्थांचे परवाने रद्द करण्याची मागणी जाहीरनाम्यात करण्यात आली असून तथाकथित ‘गोदी मीडिया’ अँकर्सच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभा किंवा राजकीय पद देऊ नये
मतदानाचा हक्क हिरावून घेणे हा गंभीर गुन्हा मानावा
संसद आणि मंत्रिमंडळात महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व
माध्यम स्वातंत्र्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट मीडिया समूहांवर निर्बंध
पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांवर २० वर्षांची बंदी
अभिजीत दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील रहिवासी आहेत. ३० वर्षीय अभिजीत यांनी पुण्यातून ब्रॉडकास्ट जर्नालिझमचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठ येथे जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कार्यरत असून डिजिटल नॅरेटिव्ह, सार्वजनिक संवाद आणि सोशल मीडिया मोहिमांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. २०२० ते २०२३ या काळात त्यांनी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान मीम-आधारित प्रचार मोहिमांमध्येही त्यांचा सहभाग होता.






