Congress announces Mai Baheen Samman Yojana Bihar Election 2025
पटना : लवकरच बिहारमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. या 2025 वर्षाच्या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून बिहारमध्ये निवडणूकीचे वारे वाहत आहेत. भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने आश्वासनांची रांग लावली असून मतदारांच्या मनात घर करण्याचे काम राजकीय पक्ष सुरु आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीप्रमाणे बिहारमध्ये देखील महिलांना आकर्षित करणाऱ्या योजना जाहीर केल्या जात आहेत.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याचा पहिला भाग प्रसिद्ध केला आहे, ज्याला काँग्रेस गॅरंटी असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेसची पहिली हमी ही महिलांसाठी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील महिलांवर लक्ष्य करणाऱ्या योजना जाहीर झाल्या आहेत. कॉंग्रेसने आश्वासन दिलेल्या या योजनेला ‘माई बहीन मान योजना’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत, दरमहा महिलांच्या खात्यात थेट 2500 रुपये जमा केले जाणार आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाटणा येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश कुमार, महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा आणि पक्षाच्या इतर नेत्यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर, राज्य प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि कन्हैया कुमार यावेळी अनुपस्थित होते.
यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजेश कुमार म्हणाले की, महिलांच्या आर्थिक यशासाठी आम्ही सज्ज आहोत. याअंतर्गत, जर बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले तर आम्ही राज्यातील महिलांसाठी दरमहा २,५०० रुपयांची हमी जाहीर करत आहोत. या योजनेचे नाव ‘माई बहीन मान योजना’ असेल. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे, तिथे अशी योजना आधीच सुरू आहे. अशी योजना प्रथम कर्नाटकात सुरू करण्यात आली आणि हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्येही ती सुरळीतपणे सुरू आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्य सरकारवर आश्वासने मोडल्याचा आरोप करताना राजेश कुमार म्हणाले की, गेल्या निवडणुकीत भाजपने बिहारच्या जनतेला असेच आश्वासन दिले होते, परंतु जेव्हा त्यांचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी ते अंमलात आणण्यास नकार दिला. पण काँग्रेस जे म्हणते ते करते. जसे तुम्ही कर्नाटक, हिमाचल आणि झारखंडमध्ये पाहू शकता. आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत काम करत आहोत.
महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा म्हणाल्या की, बिहार प्रदेशाध्यक्षांनी महिलांसाठी पहिली हमी घोषणा केली आहे याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. या योजनेचे नाव आहे – ‘माई बहीन मान योजना’, ज्यामध्ये महिलांना दरमहा २,५०० रुपये मिळतील. असे कॉंग्रेस महिला नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये लाडकी बहीण योजना निर्णायक ठरली होती. महायुती सरकारकडून निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक महिलेला 1500 रुपये देण्यात आले. तसेच निवडणुकीच्या प्रचारामध्ये या योजनेचा महायुतीच्या घटक पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. यामुळे महायुतीच्या निवडणुकीच्या निकालामध्ये मोठा विजय दिसून आला. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या धर्तीवर बिहारमध्ये देखील अशीच योजना जाहीर करण्यात आल्यामुळे कॉंग्रेस विजयश्री खेचून आणेल का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.