“दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, मणिशंकर अय्यर यांचं राजीव गांधींबाबत मोठं विधान
राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड झाली त्याचं मला आश्चर्य वाटलं होतं. कारण दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा काय होऊ शकतो?, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. एवढंच नाही तर राजीव गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही मणिशंकर अय्यर यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्याबाबत केलेलं विधान मनिशंकर यांना भोवण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेते अमित मालवीय यांनी याचा व्हिडिओही एक्सवर (ट्वीटर) शेअर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विधानामुळे अनेकवेळा वाद निर्माण झाले आहेत.
मणिशंकर अय्यर नक्की काय म्हणाले?
“राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा मला वाटलं की एअरलाइन पायलट असलेली व्यक्ती आणि दोनदा अपयशी ठरलेली व्यक्ती पंतप्रधान कशी होऊ शकते? मी त्याच्याबरोबर केंब्रिज विद्यापीठात शिकलो. केंब्रिज विद्यापीठात नापास होणं कठीण आहे. कारण त्या विद्यापीठात किमान प्रत्येकजण उत्तीर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही राजीव गांधी हे अपयशी ठरले. यानंतर ते लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये गेले. आता त्या ठिकाणी देखील ते अपयशी झाले. तेव्हा मला असं वाटलं की, दोनदा अपयशी झालेला माणूस देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे.
Rajiv Gandhi struggled academically, even failing at Cambridge, where passing is relatively easy. He then moved to Imperial College London but failed there as well…
Many questioned how someone with his academic record could become the Prime Minister.
Let the veil be stripped. pic.twitter.com/m9serSGQMs
— Amit Malviya (@amitmalviya) March 5, 2025
मणिशंकर अय्यर यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी मणिशंकर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मी निराश व्यक्तीवर भाष्य करू इच्छित नाही. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी देशाला आधुनिक दृष्टीकोन दिला. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासाठीही ठोस पावलं उचलली. पण हे दुर्दैव आहे की पक्षाचा एक भाग (काँग्रेस) त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही, नाही तर देशाचा इतिहास वेगळा असता, असं हरीश रावत यांनी म्हटलं आहे.