arvind kejriwal

मद्य धोरण घोटाळा (Liquor Policy Scam) प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याविरुद्ध तपास यंत्रणांजवळ ठोस पुरावे आहेत. त्यांनी ईडीच्या नोटीसला हुलकावणी दिली असली तरी त्यांची अटक अटळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

    नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा (Liquor Policy Scam) प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याविरुद्ध तपास यंत्रणांजवळ ठोस पुरावे आहेत. त्यांनी ईडीच्या नोटीसला हुलकावणी दिली असली तरी त्यांची अटक अटळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मद्य धोरण घोटाळ्यात केजरीवाल यांचा सहभाग असल्याचे अनेक ठोस पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

    ईडीच्या नोटीसकडे पाठ फिरवून केजरीवाल यांनी दिवाळी साजरी केली असली तरी आता त्यांच्यासाठी पळवाट उरलेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. केजरीवाल यांना अटक झाली तरी ते मुख्यमंत्रिपद सोडणार नाहीत, असे त्यांच्या निकटच्या तसेच भाजपच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. अटक झाल्यानंतर केजरीवाल राजीनामा देणार नाहीत, तर संवैधानिक संकट निर्माण करतील. त्यामुळे त्यांच्या संभाव्य अटकेनंतर केंद्रशासित दिल्लीच्या राजकारणात राजकीय संकट निर्माण होईल, असा दावा भाजपचे नेते करत आहेत.

    मला मुख्यमंत्रिपदाचा लोभ नाही : केजरीवाल

    आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आम्हाला सत्तेचा लोभ नाही, मी 49 दिवसांत राजीनामा दिला होता. मला वाटते की, मी जगातील पहिला मुख्यमंत्री आहे, ज्याने 49 दिवसांत स्वतःच्या इच्छेने राजीनामा दिला होता. मी माझा राजीनामा घेऊन फिरतो.

    मला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा लोभ नाही. राजीनामा द्यायचा की तुरुंगातून सरकार चालवायचे, याबाबत मी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत आहे. माझ्या सर्व आमदार आणि नगरसेवकांशीही चर्चा केली होती. आमची संघटना आणि कार्यकर्ते, हीच आम आदमी पार्टीची सर्वात मोठी ताकद आहे.