
'एवढा वेळ तुम्ही काय...'; Indigo Crisis वरून हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलं
इंडिगोच्या गोंधळाचा प्रवाशांना फटका
हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारला
इंडिगोने दिला 600 रूपयांचा परतावा
नवी दिल्ली: गेल्या पाच ते सहा दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सच्या सुरू असलेल्या गोंधळावरून प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. यावरून आता हायकोर्टाने केंद्र सरकारला झापले आहे. दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) या प्रकरणी सुनावणी पार पडली. इंडिगोने आतापर्यंत 600 कोटींचा परतावा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान हायकोर्टाने केंद्र सरकारला तुम्ही काय करत होता असा थेट सवाल केला आहे. सुनावणीदरम्यान नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. केंद्र सरकारने इंडिगोची उड्डाणे 5 टक्क्याने कमी केली आहेत. दरम्यान हायकोर्टात याबाबतीत आज सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारने अशी स्थिती निर्माण का होऊ दिली असा थेट प्रश्न विचारला आहे. अन्य विमान कंपन्यांना 40 हजारांपर्यंत तिकीट दर वाढवण्याची सूट कशी मिळाली? तुम्ही नेमके काय करता होता? असे म्हणत हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे.
अशा संकटांमुळे केवळ प्रवाशांना त्रास होत नाही तर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. डिजीसीएच्या नियमानुसार, प्रवाशांना परतावा दिला जावा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. तसेच परतावा इंडिगो एअरलाईन्सला परतावा देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत.
Indigo Crisis चा फटका मावळच्या गुलाब उत्पादकांना
इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाल्याने अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. या विस्कळीत सेवेमुळे मावळ तालुक्यातील गुलाबफूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मावळ तालुक्यात गुलाब शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथील फुलांची निर्यात देशातील विविध राज्यांसह परदेशातही केली जाते. दररोज सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक केली जाते, त्यापैकी २५ टक्के म्हणजे सुमारे १० लाख फुले विमानमार्गे देशभर पाठवली जातात.
मात्र इंडिगोची उड्डाणे रद्द होणे, नेटवर्कमध्ये गोंधळ निर्माण होणे आदी कारणांमुळे ही लाखो फुले पुण्यासह देशातील विविध विमानतळांवर अडकून पडली आहेत. परिणामी फुले कोमेजणे, खराब होणे यामुळे उत्पादकांना लाखोंचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
परदेशी निर्यातीवरही परिणाम
मावळातील गुलाबांचा काही हिस्सा दुबई, सिंगापूर, मलेशिया अशा देशांमध्येही निर्यात केला जातो. इंडिगोच्या नेटवर्कमधील अडथळ्यांमुळे या मालाचीही पाठवणी ठप्प झाली आहे. परदेशी बाजारपेठा वेळेवर पुरवठ्यावर अवलंबून असल्यामुळे अनेक भारतीय पुरवठादारांना कॉन्ट्रॅक्ट गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.