नवी दिल्ली – राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांचा आज दिल्ली दौरा आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक सुद्धा होणार आहे. दरम्यान, राज्यातील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे, तसेच शिंदे गटातील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार तसेच भाजपातील कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी संधी द्याची आदी विषयावर देवेंद्र फडणवीस हे अमित शहांशी चर्चा करणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत. याबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस हे अमित शहांसोबत बैठकीत चर्चा करण्याची शक्यता आहे.
[read_also content=”आमदार आदित्य ठाकरे आज पुणे व नाशिक दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार https://www.navarashtra.com/maharashtra/mla-aditya-thackeray-today-visit-to-pune-and-nashik-distric-339417.html”]
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी कशी दूर करायची, इच्छुकांची मनधरणी कशी करायची तसेच आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलेला आहे, यामध्ये मध्यस्थी करण्याचा भाजपा नेत्याकडून प्रयत्न होत आहे. यावर देखील चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाच्या 9 तर शिंदे गटातील 9 आमदारांना शपथ दिली आहे. आता दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळं फडणवीस यांच्या आजच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. पुढील आठवड्यात दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पण यात कोणकोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.