
विशेष निवडणूक पुनरिक्षण अर्थात SIR प्रक्रियेवरून देशातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विविध विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि युवक गटांकडून आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर युट्युबर ध्रुव राठी, अभिजीत दीपके आणि अभिनेते प्रकाश राज हे एकाच आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
या व्हिडीओत ध्रुव राठी यांनी बंगळूर येथील फ्रीडम पार्कमध्ये 8 ऑक्टोबरला नियोजित असलेल्या आंदोलनात ‘लोकशाहीला वाचवण्यासाठी’ येण्याचे आवाहन जनतेला केले आहे बरोबरच 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतरवरही याच आंदोलनासाठी येण्याचे आवाहन युट्युबर ध्रुव राठी यांनी केले आहे. प्रकाश राज यांनीही ‘आली रे आली आता तुझी बारी आली’ अशा मिश्कील बॉलीवूड अंदाजामध्ये ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठीच्या आंदोलनाला पुकारले आहे.
ध्रुव राठी यांची या आंदोलनातील उपस्थिती अनेक कारणांनी महत्त्वाची मानली जात आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे केंद्रातील भाजपा आणि मोदी सरकारच्या धोरणांवर त्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या युट्युब व्हिडीओमधून स्पष्टपणे टीका केली आहे. युट्युबवर त्यांचे 2 कोटींपेक्षा जास्त सबस्क्राईबर, तर Instagram वरही जवळपास 2 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्यांच्या सहभागामुळे आंदोलनाची माहिती मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर पोहोचण्यास आणि त्याकडे तरुणांचे लक्ष वेधले जाण्यास मदत होऊ शकते. यामुळेच आंदोलनाच्या एकूण प्रवाहावहीर मोठा परिणाम होऊ शकतो.