'अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका.' अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्यापासून (शुक्रवार, 2 ऑकटोबर) आंदोलन सुरू करण्यात येणार असून, हे आंदोलन देशभर नेण्याची घोषणा दिपकेंनी केली. त्यानंतर जंतर-मंतरवर ठिय्या देण्यात येईल आणि ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला. ‘दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनावेळी गृहमंत्री अमित शहांनी जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका’ असे म्हणत त्यांनी फडणवीसांना इशारा दिला.
SIRच्या प्रक्रियेवरूनही अभिजीत दिपकेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. 2025 ची SIR मतदार यादी फ्रिज करावी, अशी मागणी त्यांनी केली. ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना दिपकेंनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. मात्र, हे दावे आणि आरोप संबंधितांकडून किंवा अधिकृत तपासातून सिद्ध झालेले आहेत, असे समजणे योग्य ठरणार नाही. CJPने यापूर्वीही SIR आणि निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, मुंबईतील प्रस्तावित आंदोलनावरून दिपकेंनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ‘ज्याप्रकारे अमित शाह यांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका. आम्हाला अटक करायची असेल तर आता करा,’ असं म्हणत त्यांनी सरकारला आव्हान दिलं.
शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरूनही दिपकेंनी सवाल उपस्थित केला. ‘देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कवर रॅली करू शकतात, मग आम्ही तिथे आंदोलन का करू शकत नाही?’ असा सवाल त्यांनी केला. सत्ताधारी नेत्यांना प्रचारासाठी जागा मिळते, मग विरोधातील आंदोलनाला परवानगी का दिली जात नाही, असा त्यांचा मुद्दा होता.
परवानगी मिळाली नाही तरी आंदोलन करणार असल्याचंही दिपकेंनी स्पष्ट केलं. ‘लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत,’ असं सांगत त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मांडली. CJPने यापूर्वीही विविध मुद्द्यांवर आंदोलनं केली आहेत.
दरम्यान, 4 ऑक्टोबरच्या आंदोलनालाही CJPचा पाठिंबा असेल, अशी घोषणा दिपकेंनी केली. आदित्य ठाकरे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतः देशभर दौऱ्यावर असल्याने ते मुंबईत उपस्थित नसले तरी CJPचे कार्यकर्ते 4 ऑक्टोबरला मुंबईत सहभागी होतील, असं दिपकेंनी स्पष्ट केलं.






