नवी दिल्ली – मध्य प्रदेशचे माजी आमदार किशोर समरीते यांना सोमवारी नवे संसद भवन (सेंट्रल व्हिस्टा) बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. समरीते यांनी लोकसभा व राज्यसभेचे सुरक्षा जनरल व सभापतींना पत्र व बॅगेत जिलेटिन रॉड (स्फोटके) पाठवून संसद भवन उडवण्याची धमकी दिली होती.
दिल्ली क्राइम ब्रॅन्चचे डीसीपी अमित गोयल यांनी सांगितले की, समरीते यांना सोमवारी भोपाळच्या कोलार स्थित आर्चड पॅलेसमधून अटक करण्यात आली. आरोपीने सेक्युरिटी जनरलसह सुप्रीम कोर्ट व लोकसभेच्या अध्यक्षांना धमकीचे पत्र पाठवले होते. समरीते यांनी बालाघाटच्या लांजी मतदार संघाचे विधानसभेत नेतृत्व केले आहे. त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचाही आरोप आहे.
आठवड्याभरापूर्वी संसद भवनात तैनात सुरक्षा रक्षकाला एक बॅग आढळली होती. त्यात राष्ट्रध्वज, संविधानाची कॉपी, जिलेटिन रॉड व एक पत्र होते. या पत्रात लिहिले होते की, आमची ७० कलमी मागणी पूर्ण झाली नाही तर सेंट्रल व्हिस्टाला बॉम्बने उडवून देण्यात येईल. यासाठी ३० सप्टेंबरची मुदतही देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली क्राइम ब्रॅन्च, आयबीसह अन्य तपास यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. समरीते यांनी अखेरीस कोणत्या मागण्यांसाठी हे धमकीचे पत्र लिहिले होते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.