राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस; दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात 8 अंशांनी घट
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात देशातील काही राज्यात पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. नैऋत्य मान्सून दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील बहुतेक भागांमधून माघार घेताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तापमानात अनपेक्षितपणे 8 अंशांपर्यंत घट झाली आहे. बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अनेक ठिकाणी पाऊस पडला. सततच्या पावसामुळे हिवाळ्याची चिन्हे तीव्र झाली आहेत. येत्या काही दिवसांत हिवाळ्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. हवामान खात्याने या वर्षी भारतात तीव्र थंडीचा अंदाज आधीच वर्तवला आहे, ला निना सक्रिय होण्याची शक्यताही आहे. मान्सून आता उत्तर भारतातील पर्वतीय प्रदेश आणि पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या मैदानी प्रदेशातून पूर्णपणे माघार घेत आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert : मुंबईत आज ऑरेंज अलर्ट! ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट
याशिवाय, गुजरात आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागांतूनही मान्सून परतला आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील उत्तर प्रदेशातील भागातून मान्सून माघार घेण्यास सुरुवात झाली. गेल्या 10 दिवसांपासून पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूंनी सक्रिय मान्सून प्रणालींमुळे मान्सूनची पुढील माघार थांबली होती. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात अलिकडच्या काळात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे लवकरच मान्सून माघार घेण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
आज नवीन चक्रीवादळाची शक्यता
अरबी समुद्रातील चक्रीवादळ कमकुवत झाले आहे. 8 ऑक्टोबरच्या सुमारास पूर्व किनाऱ्यावरील उत्तर बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ अभिसरण तयार होण्याची अपेक्षा आहे. ही प्रणाली पुढील ३-४ दिवस त्याच प्रदेशात कायम राहण्याची आणि नंतर कमकुवत होऊन विरून जाण्याची शक्यता आहे.