जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस; 115 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, जनजीवन विस्कळीत
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात आता जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस झाला. या झालेल्या विक्रमी पावसाने पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. श्री माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा बुधवारी 34 वर पोहोचला. या मुसळधार पावसाने गेल्या 115 वर्षांचा रेकॉर्डच मोडल्याचे दिसून येत आहे. याचा फटका तेथील नागरिकांना बसला आहे.
जम्मूमध्ये नद्यांच्या लाटेमुळे अनेक प्रमुख पूल, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. सैन्यासह सर्व संस्था बचावकार्यात व्यस्त आहेत. आतापर्यंत 10000 हून अधिक लोकांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने बिहारसह पाच राज्यांना 12 हजार कोटी रुपयांचे चार रेल्वे प्रकल्प भेट म्हणून दिले आहेत. नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासोबतच, या राज्यांमध्ये ट्रॅक दुहेरीकरणाचे काम केले जाईल.
दरम्यान, हवामान विभागाने हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुल्लू, मंडी, मनाली येथे पाऊस सुरूच आहे. मात्र बियास नदीच्या प्रवाहाने लेह हायवेचा एक भाग वाहून गेला आहे. त्यामुळे जवळपास 50 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. 50 किलोमीटर इतकी भली मोठी वाहनांची रांग लागली होती.
हिमाचलमध्ये बियास नदीचे तांडव
देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये तर पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे. त्यामुळे अजूनही पाऊस सुरू असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा
गेले दोन ते तीन दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस राज्यात सक्रिय होणार आहे. आज सकाळपासून पुणे शहरात तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गणेशोत्सवात पाऊस मुंबई, पुणे शहरांसह अन्य जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे. हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे.