भारत पॅलेस्टाईनच्या मदतीला! गाझामधील लोकांसाठी पाठवली औषधं, 38.5 टन सामान घेऊन हवाई दलाच्या विमानाचं उड्डाण

पॅलेस्टाईनमधील लोकांच्या मदतीसाठी भारताने मदत सामग्री पाठवली आहे. यामध्ये 6.5 टन औषधे आणि शस्त्रक्रियेच्या वस्तू आहेत. यासोबतच आपत्तीच्या काळात उपयोगी पडणाऱ्या ३२ टन वस्तूही पाठवण्यात आल्या आहेत.

    इस्रायल आणि हमास यांच्यातील 15 दिवसांच्या लढाईमुळे पॅलेस्टाईनमधील 2 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. औषधे संपली आहेत. भूल न देता शस्त्रक्रिया केली जात असल्याची परिस्थिती आहे.
    या कठीण काळात भारत पॅलेस्टाईनच्या मदतीसाठी पुढे आला आहे. पॅलेस्टाईनच्या लोकांना मदत करण्यासाठी भारताने 6.5 टन औषधे, शस्त्रक्रिया वस्तू आणि इतर वैद्यकीय मदत पाठवली आहे. यासोबतच आपत्तीच्या काळात उपयोगी पडणाऱ्या ३२ टन वस्तूही पाठवण्यात आल्या आहेत. भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानाने इजिप्तमधील अल-अरिश विमानतळावर मदत सामग्री घेऊन उड्डाण केले आहे. हा माल इजिप्तहून गाझाला रस्त्याने पाठवला जाईल.
    भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, पॅलेस्टाईनमधील लोकांना जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रिया पुरवठा, तंबू, झोपण्याच्या पिशव्या, ताडपत्री, स्वच्छता सुविधा, पाणी शुद्धीकरण गोळ्या आणि इतर आवश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.

    भारताचा इस्रायलला पाठिंबा

    पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलमध्ये 1400 लोक मारले गेले होते. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करून गाझावर बॉम्बफेक सुरू केली. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 4,300 लोक मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. हमासच्या हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधातील लढाईत इस्रायलला साथ दिली आहे. दुसरीकडे, गाझामधील मानवतावादी संकट पाहता भारताने सर्वसामान्यांच्या मदतीसाठी मदत सामग्री पाठवली आहे.