श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव राबवत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित हल्लेखोरांना यमसदनी धाडले आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन महिन्यानंतर या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तीन संशयितांना लष्कराने यमसदनी धाडले आहे.
तीन महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला करत १०० पेक्षा दहशतवादी ठार मारले होते. तसेच अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली होती.
भारतीय लष्कराने श्रीनगरमधील लिडवासमध्ये ही मोठी कारवाई केली आहे. या भागात तीन दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली. त्यानंतर लष्कराने जम्मू कश्मीर पोलीस, सशस्त्र दलाच्या मदतीने ऑपरेशन महादेव राबवण्यात आले आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित हल्लेखोरांना यमसदनी धाडले आहे.
त्राल सेक्टरमधून लिडवासला जाण्यासाठी मार्ग आहे. दरम्यान लिडवास हा भाग दाट जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे या भागात मोठया सावधानतेने ऑपरेशन महादेव राबविण्यात आले. संयुक्तपणे राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. या भागात अजून काही दहशवादी लपले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. या परिसराला लष्कराने वेढा घातला आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने काय मिळवले?
१. ९ दहशतवादी लाँचपॅड नष्ट केले: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या 9 प्रमुख दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. ही लपण्याची ठिकाणे लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या संघटनांची ऑपरेशनल आणि प्रशिक्षण केंद्रे होती. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने दहशतवादाचा कणा मोडला आहे
२. पाकिस्तानमध्ये घुसून हल्लाः पहिल्यांदाच, भारताने स्वतःला पीओकेपुरते मर्यादित ठेवले नाही तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतासारख्या संवेदनशील भागांवर हल्ला केला. बहावलपूर सारख्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जिथे जैशचे मुख्यालय असल्याचे मानले जाते. ही तीच ठिकाणे आहेत जिथे अमेरिकेनेही आपले ड्रोन पाठवले नाहीत.
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. धर्म विचारून या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर भारताने अनेक निणर्य घेत पाकिस्तानची कोंडी केली. व्यापार बंद करण्यात आला. सीमा बंद करण्यात आल्या. सिंधू नदीचे पाणी रोखण्यात आले. त्यानंतर भारताने ऑपेरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तानच्या आतमध्ये जाऊन १०० पेक्षा दहशतवादी ठार मारले.