ऑपरेशन सिंदूरमधून भारतातने नक्की काय मिळवले (फोटो सौजन्य - iStock)
गेल्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ज्या प्रकारे वाढत जाऊन हिंसक झाला तो अत्यंत चिंताजनक होता. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तेव्हा संपूर्ण देशाचा संताप शिगेला पोहोचला होता. सर्वत्र सूडाची कारवाई करण्याची मागणी होत होती.
अशा परिस्थितीत, भारत सरकारने एका मजबूत लष्करी रणनीतीअंतर्गत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये अनेक किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे मोठे अड्डे उद्ध्वस्त केले. ही कारवाई इतकी प्रभावी होती की त्यानंतर पाकिस्तानने स्वतः पुढाकार घेतला आणि भारताला फोन करून युद्धबंदीचे आवाहन केले.
शनिवारी दुपारी ३:३५ वाजता, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) भारतीय डीजीएमओंना फोन केला आणि सर्व आघाड्यांवर गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याची ऑफर दिली. भारताने ते मान्य केले आणि संध्याकाळी ५:०० वाजल्यापासून युद्धबंदी लागू केली. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की चर्चेची व्याप्ती फक्त युद्धबंदीपुरती मर्यादित आहे आणि इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही.
भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने काय मिळवले?
१. ९ दहशतवादी लाँचपॅड नष्ट केले: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या 9 प्रमुख दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. ही लपण्याची ठिकाणे लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या संघटनांची ऑपरेशनल आणि प्रशिक्षण केंद्रे होती. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने दहशतवादाचा कणा मोडला आहे
२. पाकिस्तानमध्ये घुसून हल्लाः पहिल्यांदाच, भारताने स्वतःला पीओकेपुरते मर्यादित ठेवले नाही तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतासारख्या संवेदनशील भागांवर हल्ला केला. बहावलपूर सारख्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जिथे जैशचे मुख्यालय असल्याचे मानले जाते. ही तीच ठिकाणे आहेत जिथे अमेरिकेनेही आपले ड्रोन पाठवले नाहीत.
३. पाकिस्तानचे हवाई संरक्षणाचे पितळ उघड पडलेः या कारवाईदरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला पूर्णपणे उघडे पाडल्याचे दिसून आले. त्यांचा खरा चेहरा समोर आणला. संपूर्ण ऑपरेशन फक्त २३ मिनिटांत पूर्ण झाले आणि कोणत्याही भारतीय विमानाचे नुकसान झाले नाही. राफेल विमानांनी SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांचा वापर करून अचूक हल्ले केले.
४. फक्त दहशतवादी अड्ड्यांवर लक्ष ठेवणेः भारताने स्पष्ट संदेश दिला की ही लढाई दहशतवादाविरुद्ध आहे, पाकिस्तानच्या जनतेविरुद्ध किंवा सैन्याविरुद्ध नाही. कोणत्याही लष्करी तळाचे किंवा नागरी ठिकाणाचे नुकसान झाले नाही.
५. प्रसिद्ध दहशतवाद्यांचा खात्माः या कारवाईत, भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट असलेल्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांवर भारतात अनेक हल्ल्यांची योजना आखल्याचा आरोप होता. या संघटनांचे नेतृत्व एका रात्रीत संपले.
६. तिन्ही सैन्यांची संयुक्त कारवाईः ऑपरेशन सिंदूर पार पाडताना भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाची एकता दिसून आली. हे भारताच्या संयुक्त लष्करी रणनीती आणि युद्ध कौशल्याचे जिवंत उदाहरण आहे.
७. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा संदेशः दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे भारताने स्पष्ट केले. हा संदेश केवळ पाकिस्तानसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आहे की भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही. एकंदरीतच भारताने संपूर्ण जगाला एक योग्य संदेश याद्वारे दिला असल्याचे दिसून आले.