जयपूरमध्ये पुन्हा वायुगळती, Video पाहूनच उडेल थरकाप; आठवड्यापूर्वीच झाला होता २० जणांचा होरपळून मृत्य
राजस्थानमध्ये गॅस गळतीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. गेल्या आठवड्या अशाच घटनेत २० जणांना प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी असतानाच राजधानी जयपूरमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना टळली आहे. विश्वकर्मा परिसरातील रोड क्रमांक 18 वर असलेल्या गॅस फिलिंग प्लांटमधून अचानक कार्बन डायऑक्साइड (CO2) गळती होऊ लागली. परिसरात धुराचे लोट पसरलेले होते, श्वासही घेणं मुश्किल बनलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाडी.
परिसरातील नागरिकांना तत्काळ विश्वकर्मा पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या पथकाने प्लांटमध्ये जाऊन ज्या व्हॉल्व्हमधून गळती होत होती तो बंद केला. यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
#WATCH | Jaipur, Rajasthan | Today at 4:08 pm, information was received that due to the breakage of the valve of the tank of Ajmera Oxygen Plant in VKI Road, carbon dioxide was leaking. The rescue team reached the spot and saw that nothing was visible for 200 meters. As per the… pic.twitter.com/o0zmrQgWdL
— ANI (@ANI) December 31, 2024
गॅस प्लांटमधील टँकरचा व्हॉल्व्ह तुटल्याने हा संपूर्ण अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे प्लांटमधून कार्बन डायऑक्साइड वायूची गळती होऊ लागली. काही वेळातच विश्वकर्मा परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले. परिसरात जणू बर्फाची पांढरी चादर पसरल्याचा भास होत होता. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मुख्य व्हॉल्व्ह बंद करून गॅसची गळती थांबवली. त्याच वेळी, कार्बन डायऑक्साइड वायूच्या गळतीमुळे रस्त्यावरील दृश्यमानता देखील कमी झाली होती.
फिलिंग प्लांटमध्ये उभारण्यात असलेल्या टँकरमध्ये सुमारे 20 टन कार्बन डायऑक्साइड वायू भरण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास टँकरचा व्हॉल्व्ह अचानक तुटल्याने गॅस गळती होऊन परिसरात २०० ते ३०० मीटरपर्यंत वायू पसरला. विश्वकर्मा पोलिस ठाणे आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून पाण्याची फवारणी करून आणि प्लांटचा मुख्य व्हॉल्व्ह बंद करून गळती थांबवली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अपघातात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
काही दिवसांपूर्वी जयपूरमधील अजमेर हायवेवर भांक्रोटाजवळ गॅस टँकरचा अपघात आणि आगीत २० जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संपूर्ण राज्यात वाहतूक नियमांबाबत विशेष कडक कारवाई करण्यात येत आहे. जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघातानंतर काही दिवसांनी जयपूरहून मिथेन वायू घेऊन जाणारा टँकरही उलटला. आणि आता जयपूरमध्ये गॅस फिलिंग प्लांटमधून गळती झाल्याची घटना समोर आली आहे.