Jammu Kashmir : पुंछमध्ये LOC जवळ लँडमाइनचा थरार; लष्कराने वेळीच केला स्फोटकाचा नायनाट, सौजन्य : आयएएनएस
जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)च्या पुंछ जिल्ह्यातील मेंढर सब-डिव्हिजनमध्ये लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ गस्तीच्या वेळी लँडमाइन आढळल्याने सुरक्षा यंत्रणेत सतर्कता वाढली. भारतीय लष्कराच्या बॉम्ब डिस्पोजल पथकाने ही लँडमाइन सुरक्षितपणे नष्ट केली.
बालाकोटच्या फॉरवर्ड भागात नियमित गस्त सुरू असताना लष्कराच्या जवानांना लँडमाइन आढळली. त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल पथकाला तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. पथकाने कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान होऊ न देता लँडमाइन नष्ट केली.
LOC लगतच्या भागात घुसखोरी रोखण्यासाठी विविध ठिकाणी लँडमाइनचा वापर केला जातो. मात्र, मुसळधार पाऊस आणि हंगामी पुरामुळे काही वेळा या लँडमाइन आपल्या मूळ ठिकाणाहून वाहून जातात. त्यामुळे सुरक्षा दलांकडून अशा स्फोटकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे नष्ट केले जाते.
यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी मेंढर सेक्टरमधील बसूनी टॉप येथे बॉर्डर फेन्सजवळ दोन लँडमाइन आढळल्या होत्या. बॉम्ब डिस्पोजल पथकाने दोन्ही स्फोटके नियंत्रित स्फोटाद्वारे सुरक्षितपणे नष्ट केली होती.
पावसामुळे किंवा पुरामुळे स्थान बदललेल्या लँडमाइनमुळे सुरक्षा जवानांसह सीमावर्ती भागातील नागरिकांनाही धोका निर्माण होऊ शकतो. डोंगराळ भागात जंगलातील आगीमुळे जुन्या किंवा स्थान बदललेल्या लँडमाइनचा अचानक स्फोट होण्याची शक्यताही असते.
दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना, विशेषतः शेतकरी आणि गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या मुलांना, अनोळखी किंवा संशयास्पद वस्तूंपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. कोणतीही धातूची किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास तिला स्पर्श करू नये किंवा हलवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी वस्तू आढळल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या सुरक्षा चौकी किंवा पोलिसांना माहिती द्यावी. त्यानंतर प्रशिक्षित पथकाकडून त्या वस्तूची तपासणी करून आवश्यक कारवाई केली जाते. सीमेवरील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर ठेवण्यात आली असून, ड्रोनच्या माध्यमातून निगराणी आणि जंगलातील गस्तही वाढवण्यात आली आहे.






