(Photo - X)
Rahul Gandhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत पुन्हा राडा सुरु झाला आहे. आधी ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ कडून जोरदार आंदोलन करण्यात आले. आता काँग्रेसनेही जोरदार आंदोलनाला सुरुवात केली असून आज (8 ऑकटोबर) सलग तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी इंडिया आघाडीच्या खासदारांसह आणि कार्यकर्त्यांसह मैदानात उतरले आहेत.
राहुल गांधींना सलग दोन दिवस पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजघाट या ठिकाणी इंडिया आघाडीचे खासदार आंदोलनाला उतरणार आहेत.
इंडिया आघाडीचं आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू आहे. मंगळवारी राहुल गांधींसह अनेक खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर राहुल गांधी यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या आंदोलन केलं. तब्बल आठ तासांनंतर पोलिसांनी राहुल गांधींसह आंदोलनकर्त्या खासदारांना ताब्यात घेतलं.
दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर खासदार जंतर-मंतरच्या दिशेने निघाले. मात्र पोलिसांनी त्यांना पुन्हा अडवलं. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आलं.
सलग दोन दिवस पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही इंडिया आघाडीचा आक्रमक पवित्रा कायम आहे. आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार राजघाटाच्या दिशेने रवाना झाले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जवळपास 300 खासदार शांततेत आंदोलन करणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.
गेल्या दोन दिवसांपासून सरकार आपल्याला आंदोलन करू देत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांनी ‘व्होट चोरी’ करून देशातील लोकशाही संपवली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणात संबंधितांना शिक्षा मिळणारच, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.






