
Jammu Kashmir : दहशतवादाविरोधात धडक कारवाई, कुपवाड्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir ) कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरात भारतीय सैन्याने बुधवारी एका संयुक्त मोहिमेदरम्यान जंगलात निर्माण केलेल्या दहशतवादी तळाचा शोध घेत तो उद्धवस्त केला आहे. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा पथकाने येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, एका विशेष सूचनेच्या आधारे हंदवाडा पोलिसांनी 21 राष्ट्रीय रायफल्स (आरआर) आणि 92 बटालियन सीआरपीएफसोबत एकत्रितपणे हंदवाडाच्या नागदानार वन क्षेत्रात संयुक्त शोध मोहिम राबवली. मोहिमेदरम्यान संयुक्त दलाला जंगलात एक जुने तळ आढळले, जे त्यांनी नष्ट केले आहे.
सुरक्षा पथकांनी या ठिकाणावरून 1 एके 47 रायफल, 3 हातगोळे, एके-47 चे 857 काडतूस, 192 पीका राउंड, एके 47 च्या 8 मॅगजीन, 1 सायलेन्सर आणि पिस्तुलच्या 83 काडतूस जप्त केल्या आहेत. त्याशिवाय येथून काही आक्षेपार्ह सामग्रीही सुरक्षा पथकांना आढळल्या आहेत.
याप्रकरणी हंदवाडा पोलिसांनी एफआयआर संख्या 232 नोंदवले आहे. तसेच त्यांनी विविध कलमांतर्गत कारवाईही सुरू केली आहे. जप्त करण्यात आलेले शस्त्रांचे स्त्रोत तसेच त्यांच्या मागील सक्रिय दहशतवादी नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
उल्लेखनीय बाब अशी की, यापूर्वी सप्टेंबरमध्येही संयुक्त दलांनी हंदवाडा-कुपवाडा भागात प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनसाठी कथित स्वरूपात हायब्रिड मोडमध्ये काम करणाऱ्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. या कारवाईदरम्यान क्रुहमुरा हंदवाडा येथील रहिवासी मंजूर अहमद भट याला अटक करण्यात आली होती आणि त्याच्याकडून चीन बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझिन आणि १६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती.
सुरक्षा यंत्रणांच्या मते, हायब्रिड दहशतवाद हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या बदलत्या स्वरूपाचा एक भाग आहे. हायब्रिड दहशतवादी सामान्यतः सुरक्षा रेकॉर्डमध्ये सक्रिय दहशतवादी म्हणून नोंदवले गेलेले नसतात आणि ते एका सामान्य नागरिकासारखे जीवन जगतात. दहशतवादी संघटनांनी एखादे लक्ष्य (टार्गेट) सोपवल्यानंतर ते हल्ला करतात आणि पुन्हा आपल्या सामान्य दैनंदिन कामात परतण्याचा प्रयत्न करतात.