
jantar mantar protest delhi police
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान (Jantar Mantar Protest) तीन महिला पत्रकारांनी दिल्ली पोलिसांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या तक्रारी दिल्ली पोलिसांनी निष्पक्ष चौकशीसाठी क्राइम ब्रँचकडे वर्ग केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचवेळी या तक्रारी करण्यात आल्या.
न्यू दिल्ली जिल्हा पोलिसांकडे तीन महिला पत्रकारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तक्रारी क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आल्या आहेत. क्राइम ब्रँचकडून तक्रारदार महिला पत्रकार तसेच संबंधित इतर व्यक्तींचे जबाब नोंदवले जाणार आहेत. त्यानंतर आरोपांबाबत उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीची चौकशी केली जाणार आहे.
यापैकी एका महिला पत्रकाराने PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) यांनी आंदोलनाचं वार्तांकन करताना आपल्यासोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. संबंधित पत्रकाराने दावा केला की, आंदोलकांना ताब्यात घेत असताना घटनास्थळी महिला पोलीस कर्मचारी नसल्याबाबत तिने ACP विवेक भगत यांना प्रश्न विचारला. त्यानंतर आपल्यासोबत गैरवर्तन करून आपल्याला मागे ढकलण्यात आल्याचा तिचा आरोप आहे. या आरोपांची चौकशी सध्या सुरू असून त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
तक्रार दाखल करण्यासाठी आपण आणि इतर पत्रकार पोलीस ठाण्यात गेल्याचंही संबंधित पत्रकाराने सांगितलं. त्यानंतर पत्रकार आणि आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेर कारवाईची मागणी केली होती.
या घटनेवर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानेही चिंता व्यक्त केली आहे. आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी अशा प्रकारचं वर्तन लोकशाहीत सामान्य होऊ नये, असं कौन्सिलने म्हटलं आहे. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावं आणि आंदोलनाचं वार्तांकन करताना त्यांना दबाव किंवा आक्रमक वर्तनाचा सामना करावा लागू नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, जंतरमंतरवरील या प्रकरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा आणि पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता क्राइम ब्रँकच्या चौकशीत या तक्रारींवर नेमकं काय निष्पन्न होतं, याकडे लक्ष लागलं आहे.