कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांदरम्यान सिद्धारमय्यांची चतुर खेळी; दोन शहरांची नावंच बदलली
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांदरम्यान सध्याचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी एक राजकीय मास्टरस्ट्रोक खेळला आहे. त्यांनी दोन महत्त्वाच्या शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेत देशाचं लक्ष पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाकडे वळवलं आहे. बंगळुरू ग्रामीण जिल्ह्याचं नाव आता ‘बंगळुरू नॉर्थ’ असं करण्यात आलं असून, बागेपल्लीचं नाव ‘भाग्यनगर’ असं ठेवण्यात आलं आहे.
या नामांतर निर्णयामुळे कर्नाटकातील सत्तेतील अंतर्गत हालचालींवर झाक पडली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री बदलावरून चर्चांचा भडका उडालेला असताना सिद्धारमय्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत, राज्यात नव्या प्रशासकीय पावलांची सुरुवात केली आहे.
या आधी, मे महिन्यात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या पुढाकाराने रामनगर जिल्ह्याचं नाव ‘बंगळुरू साऊथ’ असं ठेवण्यात आलं होतं. रामनगर हे शिवकुमार यांचं मतदारसंघ असल्यामुळे त्या नावबदलाच्या मागे राजकीय संदेश असल्याचं म्हटलं गेलं. आता, पुन्हा दोन नवीन नावबदलांची घोषणा झाल्याने नामांतराची मालिका सुरूच असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
सत्तेवर वर्षपूर्ती करत असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. काही काँग्रेस आमदारांनी खुलेआम उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रामनगरचे आमदार एच. ए. इक्बाल हुसेन यांनी सार्वजनिकरित्या सप्टेंबरमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याचं वक्तव्य केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.या सर्व चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन प्रतिक्रिया दिली. “कर्नाटकमध्ये कोणताही नेतृत्वबदल होणार नाही. काँग्रेस सरकार स्थिर असून, मीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार आहे,” असं सिद्धारमय्या यांनी ठणकावून सांगितलं. त्यांनी पक्षातील एकतेचा दावा करत अंतर्गत वादांचे संकेत फेटाळून लावले.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनीही नेतृत्वबदलाच्या शक्यतेला दुजोरा दिलेला नाही. मात्र, त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची महत्त्वाकांक्षा लपवलेली नाही, हेही तेवढंच खरं आहे.काँग्रेसने मे २०२३ मध्ये विजय मिळवल्यानंतर सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्री आणि डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. त्यावेळी अंतर्गत समन्वयासाठी अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपदाचे वाटप होईल अशी चर्चा होती. तथापि, काँग्रेसकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सध्याची विधानसभेतील स्थिती
कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ जागांपैकी काँग्रेसकडे १३५ जागा असून, ती बहुमतात आहे. भाजपकडे ६६, तर जेडी(एस)कडे १९ जागा आहेत. उर्वरित ४ जागा अपक्ष आणि इतरांकडे आहेत.