पाटणा : लोकजनशक्ती पक्ष रामविलास राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. एनडीएमध्ये अद्याप जागावाटप नाही पण त्याआधी चिराग पासवान यांनी बिहारमध्ये लोकसभेच्या जागेसाठी तयारी सुरू केली आहे.
10 मार्च रोजी चिराग पासवान यांची मोठी रॅली होणार आहे. यात काहीतरी मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जमुईचे खासदार आणि एलजेपी (राम विलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान हे सध्या बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीत दिसत नाहीत. यावरून अनेक प्रकारचे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.
चिराग पासवान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्टर शेअर केली आहे. चिराग पासवान जनआशीर्वाद महासभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 10 मार्च रोजी वैशाली येथील साहेबगंज येथील हायस्कूलच्या मैदानावर दुपारी 11.30 वाजता चिराग यांचा भव्य मेळावा होणार आहे.
विशेष म्हणजे या पोस्टरवर एनडीएच्या कोणत्याही नेत्याचे छायाचित्र नाही. चिराग पासवान हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अकाऊंटवर जे पोस्टर शेअर करत आहेत त्यात पंतप्रधान मोदी आणि इतर एनडीए नेत्यांची छायाचित्रे नसल्याचेही दिसून येत आहे.