महादेव जानकर मोठा निर्णय घेणार का? दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीने सरकार स्थापन केल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटीमुळे युतीसह आघाडीच्या समीकरणात मोठे बदल झाले आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नवी दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जानकर यांनी राहुल गांधींची भेट का घेतली याचे कारणही समोर आले आहे.
जानकर यांनी राहुल गांधींना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती महोत्सवाचे निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. तसंच त्यांच्यासोबत अन्य विषयांवर चर्चा केली आहे. महादेव जानकर यांनी यंदा अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचं दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम इथं आयोजन केलं आहे. या सोहळ्यासाठी जानकर यांनी विविध मान्यवरांना निमंत्रण दिलं असून, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित केलं आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले, भाजपने आम्हाला विचारले नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यावर भाजपला छोट्या पक्षांची गरज नाही. त्यामुळे दुसरा पर्याय निवडला पाहिजे, हा विचार केला. काल राहुल गांधी यांनी घरी बोलवले होते. मला सन्मानाची वागणूक दिली. राहुल गांधींसोबत जनगणनाबाबत चर्चा झाली. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली. यापुढे स्टॅलिन, शरद पवार, तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. माझ्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे मोठे आहेत. मोठा पक्ष छोट्याला दाबतो, त्याचा अनुभव त्यांना येईल, असेही महादेव जानकर म्हणाले.
पुढे बोलतांना जानकर म्हणाले, आमच्यासाठी भाजपने दार बंद केली आहे. आमची काही चूक नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की, त्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायचे आश्वासन दिले होते, ते पाळले गेले पाहिजे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समाविष्ट करावा आणि मराठा आरक्षण द्यावे, असा निर्णय चोंडीच्या कॅबिनेटमध्ये घ्यावा. तसेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना बंद करू नये, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली.